संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपायी राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या घराण्यांमध्ये निर्माण झालेल्या राजकीय बेबनावात आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या घराण्याची भर पडली आहे.

देशात किंवा राज्यात विविध नेत्यांनी सरकार वा पक्षातील सारी पदे आपल्याच घरात ठेवण्यावर गेल्या काही वर्षांत भर दिला. एकाच घराण्यातील तीन ते चार जण राजकारणात सक्रिय झाले. त्यातून पदांसाठी घरातच बेबनाव निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात हे प्रमाण अधिक आहे. त्यात प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर- पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, काँग्रेस नेते रणजित देशमुख , माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील या नेत्यांच्या घराण्यांचा समावेश आहे.

हेही वाचा…डॉ. सुधीर तांबेंमुळे काँग्रेसची कोंडी, नाशिकमध्ये भाजपची खेळी यशस्वी ?

नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी काँग्रेसने माजी मंत्री व विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली. परंतु त्यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. डॉ. तांबे यांचे पुत्र व युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच रिंगणात नाही. बाळासाहेब थोरात यांनी भाचा सत्यजित तांबे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला मुरड घातल्यानेच हा बेबनाव निर्माण झाल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. थोरात यांनी आपल्या कन्येला राजकीय वारस म्हणून पुढे आणल्याने सत्यजित अस्वस्थ होते. संधी मिळताच सत्यजित तांबे यांनी थोरात यांना ‘मामा’ बनविले.

हेही वाचा… महाविकास आघाडीचा निर्णय शिक्षक संघटनांनी धुडकावला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरातही राजकीय महत्त्वाकांक्षेतूनच फाटाफूट झाली. राज ठाकरे यांनी बाहेर पडत मनसेची स्थापना केली. ठाकरे बंधूमधील वाद सतत बघायला मिळतो. राज ठाकरे हे शिवसेनेवर टीकाटिप्पणी करण्याची संधी सोडत नाहीत. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी कन्या पंकजा यांना राजकीय वारस म्हणून पुढे आणल्याने पुतणे धनंजय मुंडे यांनी वेगळी वाट पत्करली. गेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय विरुद्ध पंकजा या चुलत्यांमध्येच लढत झाली होती.

हेही वाचा… लातूरमधील राजकीय संभ्रमाला पूर्णविराम

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पश्चात त्यांच्या घराण्यात राजकीय वाद झाले. प्रकाश पाटील व मदन पाटील यांचे गट वेगवेगळे झाले. दादांच्या घरातील वादावर पडदा टाकण्यात ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनाही यश आले नाही. दुसरे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना विधानसभेत नातवानेच पराभूत केले होते. सून व नातवाने भाजपमध्ये जाऊन निलंग्यातील शिवाजीरावांच्या वर्चस्वालाच आव्हान दिले होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या घराण्यात राजकीय वाद बघायला मिळाले. दादांचे भाऊ प्रतापसिंह मोहिते यांनी पुतण्या रणजितसिंह यांचे प्रस्थ वाढू लागताच विरोधी भूमिका घेतली होती. प्रतापसिंह यांच्या पश्चात त्यांच्या मुलाने वेगळ्या पक्षात जाऊन आव्हान दिले आहे.

हेही वाचा… सांगलीत नियोजन समितीवरील सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या

काँग्रेसच्या एकेकाळच्या नेत्या बीडच्या केशरकाकू क्षीरसागर यांचे जयजदत्त क्षीरसागर हे पुत्र. ते राजकारणात स्थिरावले व मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वाची खाती भूषविली. पण गेल्या निवडणुकीत पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त यांचा पराभव केला. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत आपले काका व माजी मंत्री अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. देशमुख चुलत्यांमधील भाऊबंदकी राजकारणातही बघायला मिळाली. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे बंधू पवनराजे निंबाळकर यांच्यात उस्मानाबाद मतदारसंघात चुरशीची लढत झाली होती. आधी डॉ. पाटील यांचा मतदारसंघ व साखर कारखाना पवनराजेच बघत असत. पण दोघांमध्ये वितुष्ट आले व इतक्या टोकाला गेले की पवनराजे यांच्या हत्येत डॉ. पद्मसिंह पाटील हे आरोपी होते. ही सारी राजकारणात सक्रिय असलेली काही प्रमुख घराणी आहेत. याशिवाय स्थानिक पातळीवर अनेक घरांमध्ये राजकीय वाद झाले आहेत. मराठवाड्यात मुलगी विरुद्द वडिल अशी विधानसभेत लढत झाली होती आणि मुलीने वडिलांना पराभूत केले होते.

हेही वाचा… जळगाव भाजपच्या खासदार व आमदारामधील मतभेद चव्हाट्यावर

अजित पवारांचे बंड शमले

२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार महाविकास आघाडीची जुळवाजुळव करीत असताना त्यांचे पुतणे अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह वेगळी भूमिका घेत देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने सरकारमध्ये सहभागी झाले होते. फडणवीस व अजितदादांचा पहाटेचा शपथविधी तेव्हा गाजला होता. पण शरद पवार यांनी अजितदादांचे बंड मोडून काढले. अवघ्या ७२ तासांत अजित पवार हे पुन्हा मूळ प्रवाहात आले होते व त्यांचे बंड शमले होते.

नाईक घराण्यातही संघर्ष

राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या वसंतराव नाईक यांच्या घराण्यातही राजकीय संघर्ष झाला. सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपद तर मनोहरराव नाईक यांनी मंत्रिपद भूषविले. तिसऱ्या पिढीतील निलय नाईक यांनी संधी न मिळताच भाजपचा मार्ग पत्करला. गेल्या वेळी पुसद मतदारसंघात इंद्रनील आणि निलय या दोन चुलत्यांमध्येच लढत झाली होती. निलय नाईक सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another rebellion dispute in political family in the state print politics news asj