अकोला : अकोल्यातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांना राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा श्यामराव धोत्रे हे आमदार होते. त्यानंतर वडील संजय धोत्रे यांची तीन दशकावून अधिक काळाची यशस्वी राजकीय कारकीर्द आहे. संजय धोत्रे यांनी सर्वप्रथम मुर्तिजापूर मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व केले. २००४ मध्ये त्यांना अकोल्यातून भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली. लोकसभेवर सलग चार निवडणुकांमध्ये ते विक्रमी मताधिक्याने निवडून गेले. २०१९ मध्ये त्यांची नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. अनुप धोत्रे यांच्या मातोश्री सुहासिनी धोत्रे भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत.
अनुप धोत्रे यांचा जन्म २४ मे१९८४ रोजी झाला आहे. पुणे येथील सिंबायोसिस महाविद्यालयातून बी.कॉम.चे त्यांनी शिक्षण घेतले. वडिलांच्या आजापणामुळे त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी अनुप धोत्रे सक्रिय झाले. या अगोदर कधी निवडणूक लढली नसली तरी वडिलांच्या निवडणुकीच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर नेहमी राहतच होती. सोशल मीडिया प्रभारी म्हणून पक्षात त्यांनी जबाबदारी पार पाडली. युवकांचे संघटनात्मक जाळे निर्माण केले. अनुप धोत्रे यांच्यावर २०२४ मध्ये अकोला लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देत पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. त्या दृष्टिने ते कामाला लागले. तळागाळातून जनसंपर्क वाढविण्यासोबतच पक्षसंघटन मजबूतीवर त्यांनी भर दिला. त्याचा लाभ त्यांना निवडणुकीत झाला.
हेही वाचा…ओळख नवीन खासदारांची : बळवंत वानखडे (अमरावती – काँग्रेस) ; सरपंच ते खासदारकी…
अकोला येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अनुप धोत्रे यांचा उद्योग समूह आहे. यामध्ये इंजिनीअरिंग वर्क्स, नकुल इंडस्ट्रीज, स्प्रिंकलर सेट, एचडीपीई पाइप्स उत्पादन, रेपोल प्लास्टिक, थर्मल पॉवर प्रोजेक्टसाठी जॉब वर्क, अन्न प्रक्रिया युनिट, बांधकाम आणि शहरी भूविकास आदी व्यवसायांचा समावेश आहे. प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी असण्यासह कृषी विज्ञान केंद्राचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. ग्वाल्हेर येथील जीआयसीटीएस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ते सचिव आहेत, तसेच अभिनव बाल शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. अकोला येथील नीळकंठ सहकारी सूतगिरणीचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत.