मागील अनेक दिवसांपासून अभिनेता शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. तसेच ही दृश्य हटवली गेली नाही, तर आम्ही हा चित्रपट चालू देणार नाही, अशी भूमिकाही काही संघटनांनी घेतली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटांवर अनावश्यक प्रतिक्रिया देणं टाळा, अशी सूचना भाजपाच्या नेत्यांना केल्यानंतर हा विरोध मावळला. त्यानंतर आता केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर चित्रपटांना केला जणारा विरोध आणि बायकॉटच्या ट्रेंडवर भाष्ये केले आहे. अशा नकारात्मक टिप्पणींमुळे देशातील वातावरण बिघडते, असे अनुराग ठाकूर म्हणाले. ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा>>> “फक्त सेक्स आणि शाहरुख खान…” २० वर्षांपूर्वी नेहा धुपियाने केलेलं वक्तव्य ‘पठाण’च्या निमित्ताने पुन्हा चर्चेत
अनुराग ठाकुर काय म्हणाले?
“भारतीय चित्रपट जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. मात्र चित्रपटांविषयी करण्यात येत असलेल्या नकारत्मक प्रतिक्रियांमुळे सामाजिक स्वास्थ बिघडते. कधीकधी काही लोक चित्रपटामध्ये काय आहे, हे माहिती नसतानाही, आपल्या प्रतिक्रिया देतात. त्यामुळे अशा प्रतिक्रियांमुळे वातावरण दूषित होते,” असे अनुराग ठाकुर म्हणाले.
“सीबीएफसीने प्रमाणित केल्यानंतरच कोणताही चित्रपट प्रदर्शित केला जातो. तरीदेखील कोणाला चित्रपटांबद्दल काही आक्षेप असतील तर ते आम्हाला सांगावेत. आम्ही ते सीबीएफसी बोर्डाकडे पाठवू,” असेही अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
दरम्यान, शाहरुख खानच्या चित्रपटाला बॉयकॉट करा असा प्रचार काही संघटनांकडून केला जात होता. मात्र या सर्व प्रचाराला झुगारून सिनेरसिकांनी मोठ्या संख्येने हा चित्रपट पहिला. त्याचाच परिणाम म्हणून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अजूनही हा चित्रपट चित्रपटगृहांत सुरू आहे.