आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात युती झाली आहे. मात्र, दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये अद्यापही मतभेद असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेतही या मतभेदाचे प्रदर्शन बघायला मिळाले. त्यामुळे काँग्रेस-आम आदमी पक्षाचे मनोमीलन तर झाले, पण नेत्यांचे काय? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या गुजरातमध्ये असून शनिवारी ती भरूच येथे दाखल झाली. यावेळी काँग्रेस आणि आपचे नेते उपस्थित होते. मात्र, यावेळी आपचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या पक्षाचे झेंडे घेऊन उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ही यात्रा जेव्हा भरूचमधून नेतरंगच्या दिशेने पुढे गेली, तेव्हा मात्र दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकत्र दिसले; तरी त्यांच्यातील मतभेद स्पष्टपणे दिसत होते.

हेही वाचा – जागावाटपाची चर्चा सोडून नितीशकुमार ब्रिटनमध्ये ‘सहली’ला

याशिवाय भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान दाहोद जिल्ह्यातील झालोद येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेतही काँग्रेस आणि आपच्या नेत्यांमध्ये मतभेद बघायला मिळाले. यावेळी राहुल गांधी यांच्याबरोबरच आपचे नेतेही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी आदिवासी समुदायाचे पारंपरिक धनुष्यबाण देऊन राहुल गांधी यांचे स्वागत केले. मात्र, त्यांच्या भाषणात आपच्या नेत्यांचा किंवा काँग्रेस-आप युतीचा पुसटसाही उल्लेख नव्हता.

भारत जोडो न्याय यात्रा झालोदमधून पुढे निघाली तेव्हा आपचे नेते चैतर वसावा हे राहुल गांधी यांच्या जीपवर उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. त्याच वेळी जीपवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंग राणादेखील उपस्थित होते. मात्र, वसावा आणि राणा यांनी एकमेकांकडे बघितलंसुद्धा नाही.

याबरोबरच काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल आणि मुलगी मुमताजदेखील या यात्रेत अनुपस्थित होते. यावरून विविध चर्चांना उधाण आले होते. फैजल पटेल यांनी यापूर्वी भरूचची जागा आम आदमी पक्षाला दिल्याने जागावाटपावरून काँग्रेसच्या नेत्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. खरं तर भरूच हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिल्लीत असल्याचे फैझल पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा – गुजरातच्या जनतेनं विरोधकांना स्थानच ठेवलेलं नाही; काँग्रेस नेत्याचं विधान

दरम्यान, शनिवारी काँग्रेस नेते अर्जुन राठवा आणि आपच्या नेत्या राधिका राठवा यांनी एकत्रितपणे माध्यमांना मुलाखत दिली. यावेळी काँग्रेस आणि आपच्या नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद नसून आम्ही दोन्ही पक्ष मिळून ही निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले. तसेच पक्षाने गुजरातमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून आम्ही वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाचे पालन करत आहोत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

योगायोगाने राधिका राठवा या काँग्रेसच्या माजी नेत्या आहेत. त्यांनी २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. तसेच पावी जेतपूर मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती, तर अर्जुन राठवा हे आम आदमी पक्षाचे नेते होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.