छत्रपती संभाजीनगर: वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी निलंबित पोलीस निरीक्षकाला स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती देण्यासाठी थेट पोलीस अधीक्षकांना धारेवर धरले. ‘मी सांगितले तसेच झाले पाहिजे, चर्चा- बिर्चा काही नाही, असे सांगताना आपण मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नसतो, असे म्हणत शेखी मिरवली. हे चलचित्रण समाजमाध्यमांमधून पसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. धाराशिव येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले. या पदावर येण्यासाठी इच्छुक असलेले निलंबित पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी थेट पालकमंत्री सावंत यांच्याकडूनच दबाव आणल्याची चर्चा आहे.
आंबेजोगाई येथे अवैद्य धंद्यांना अभय, आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात कुचकामी ठरलेल्या मोरे यांच्यावर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः निलंबनाची कारवाई केली होती. ऑगस्ट २०२२ मध्ये निलंबित झालेल्या मोरे यांनी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या नियुक्तीसाठी जोर लावला होता. सावंत यांनी चक्क कार्यकर्त्यांच्या घोळक्यात जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना धारेवर धरले. या अनुषंगाने पाेलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा दूरध्वनी बंद होता. व्हायरल झालेला व्हिडीओ नेमका किती दिवसांपूर्वीचा आहे हे यातून स्पष्ट होत नाही. मात्र,याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही घटना घडली असल्याची चर्चा आहे. “धारशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या रिक्त झालेल्या जागी पोलीस निरीक्षक म्हणून वासुदेव मोरे यांची नियुक्ती करा, त्यांची ऑर्डर आजच्या आज काढा, मी सांगेल ते करायचं. मी मुख्यमंत्र्याचं देखील ऐकत नाही, ” अशी दमबाजी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सार्वजनिक ठिकाणी केली आहे.
हेही वाचा… शिंदे गटात वचक ना नेत्यांवर, ना आमदारांवर
निलंबित पोलीस निरीक्षकावर जिल्ह्याची जबाबदारीअवैध मद्यविक्री करणारांना पाठीशी घातल्याचा ठपका ठेवत अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना शासनाने १८ ऑगस्ट २०२२ रोजी निलंबित केले होते. भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत त्यासाठी लक्षवेधी उपस्थित केली होती. आता त्याच निलंबित पोलीस निरीक्षकाला धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा… मालेगावात राजकीय वातावरण तप्त, भुसे व हिरे यांच्यातील वाद पेटला
या पूर्वीही सावंत यांच्या विधानांमुळे सरकारच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. खेकड्यामुळे धरण फुटले असेल, असे सांगणाऱ्या सावंत यांच्यामुळे धाराशिवच्या राजकारणात अनेक बदल झाले आहेत. आता नोकरशाहीवर मुख्य व्यक्तींच्या नेमणुकीवरुन दबाव आणला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.