कर्नाटक आणि तेलंगणातील काँग्रेसच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजाविणारे प्रसिद्ध रणनीतीकार सुनील कानुगोलू यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी काँग्रेसने सोपविली आहे. राज्यातील नेत्यांशी कोनुगोलू यांनी रणनीतीबाबत नवी दिल्लीत मंगळवारी चर्चा केली. कानुगोलू यांच्या सल्ल्यानुसार आता राज्यात काँग्रेसची रणनीती निश्चित केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनील कानुगोलू यांना सध्या काँग्रेसमध्ये प्रचंड मागणी आहे. कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळण्यात कानुगोलू यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या समुहात एकेकाळी काम केलेल्या कानुगोलू यांनी स्वत:ची कंपनी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षाच्या धोरण समितीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. निवडणूक रणनीतीमध्ये कानुगोलू हे माहिर मानले जातात. काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये कानुगोलू यांचा समावेश आहे.

हेही वाचा – विखे विरुद्ध लंके वाद चिघळला

गेल्या वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सत्ता मिळण्यात सुनील कानुगोलू यांचे निवडणूक नियोजन यशस्वी ठरले होते. कर्नाटकताली तत्कालीन भाजप सरकारच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री बोम्मई यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. ‘४० टक्के कमिशनचे सरकार’ आणि ‘पे सीएम’ या दोन घोषणा लोकप्रिय ठरल्या होत्या. ‘पेटीएमच्या धर्तीवर पे सीएम’ ही कानुगोलू यांची घोषणा आकर्षक ठरली होती. कर्नाटकातील प्रचाराची सारी रणनीती त्यांनी ठरविली होती. गेल्या डिसेंबरमध्ये तेलंगणाच्या प्रचाराची जबाबदारी कानुगोलू यांच्याकडेच होती. मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांच्या प्रचाराचे सारे नियोजन त्यांनीच केले होते. राजस्थान आणि मध्य प्रदेशात अनुक्रमे अशोक गेहलोत आणि कमलनाथ यांनी कानुगोलू यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले होते, असे काँग्रेसमध्ये बोलले जाते.

कर्नाटक आणि तेलंगणातील विजयात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या कानुगोलू यांच्याकडे आता महाराष्ट्रातील निवडणुकीची रणनीती ठरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या संदर्भात कानुगोलू यांनी मंगळवारी नवी दिल्लीती राज्यातील काही निवडक नेत्यांबरोबर सविस्तर चर्चा केली. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सू. वेणूगोपाळ हे बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा – कोकणपट्टीवरच महायुतीची भिस्त, भाजपच्या बैठकीत ३९ जागांचा आढावा

राज्यात काँग्रेसचा प्रचार आणि रणतीनी काय असावी यावर खल करण्यात आला. तसेच कानुगोलू यांच्या संस्थेच्या वतीने राज्यातील मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्याने काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यातूनच काँग्रेसने राज्यातील विधानसभेची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसने किमान १०० तरी जागा लढवाव्यात, अशी पक्षात चर्चा झाली आहे. यानुसार आता कानुगोलू हे पक्षाची रणनीती ठरविणार आहेत.

अजित पवार यांनीही सल्लागार नेमला

आगामी विधानसभा निवडणुकीत चांगल्या यशासाठी रणनीती ठरविण्याकरिता राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सल्लागाराची नियुक्ती केली आहे. नवी दिल्लीस्थित नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बाॅक्स’ या संस्थेची मदत घेण्यात येत आहे. सर्व रणनीती ही कंपनी ठरविणार नाही. पण काही बाबतीत पक्षाला सल्ला देण्याचे काम करेल, असे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Architect of congress victory in karnataka telangana sunil kanugolu is in charge of maharashtra print politics news ssb
Show comments