महेश सरलष्कर, अदोनी (आंध्र प्रदेश)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आम्ही केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमधून आंध्र प्रदेशमध्ये आलो. वाटेत अनेक लोक भेटले, त्यांची मैत्री झाली. ते आम्हाला फोन करून कुतुहलाने प्रश्न विचारत असतात, राहुल गांधी, दिग्विजय सिंह अजून चालत आहेत का?’, कर्नाटकमधून आलेल्या सेवादलाच्या कार्यकर्त्या प्यारी जान सांगत होत्या.

‘भारत जोडो’ यात्रेतील ११८ यात्रेकरूंपैकी प्यारी जान एक. यात्रेचे ४२ दिवस पूर्ण झाले आहेत. जसजसे यात्रेचे दिवस वाढत आहेत, तसे लोकांमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेबद्दल कुतूहल वाढू लागले आहे. लोक पहाटे चार वाजल्यापासून यात्रा सुरू होण्याची वाट पाहात असतात. या लोकांना कोणी आणलेले नाही, ते स्वतःहून येतात, असे प्यारी जान म्हणाल्या. यात्रेसाठी निवड करण्याआधी दिग्विजय सिंह यांनी त्यांना एकच प्रश्न विचारला होता, ‘तुम्हाला यात्रा पूर्ण होईपर्यंत चालता येईल का?’… दीडशे दिवसांहून अधिक काळ सुमारे साडेतीन हजार किमीचा टप्पा यात्रेकरूंना पार करावा लागणार आहे. दररोज किमान २०-२२ किमीची पदयात्रा करावी लागते. सकाळी साडेचार वाजता दिवस सुरू होतो, साडेसहा वाजता पदयात्रा निघते.

हेही वाचा… ‘भारत जोडो यात्रे’त राहुल गांधींचा फिटनेस चर्चेच्या केंद्रस्थानी

‘भारत जोडो’ यात्रेमध्ये ३० महिला यात्री सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यासाठीच नव्हे तर प्रत्येक यात्रेकरूसाठी हा देशव्यापी प्रवास खडतर आहे. हिमाचल प्रदेशहून आलेल्या ज्योती खन्ना यांची प्रकृती बिघडली होती. रक्तदाब आणि शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्या चक्कर येऊन खाली पडल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, सलाइन दिल्यानंतर त्या पुन्हा यात्रेत सहभागी झाल्या. ‘आज मी ठीक आहे, मी सकाळच्या सत्रातील पदयात्रा केली. काही झाले तरी पदयात्रा पूर्ण करण्याचा दृढनिश्चय केलेला आहे’, असे खन्ना यांनी सांगितले. ‘आम्ही आजारी पडलो तसा आमचा नेताही आजारी पडू शकतो. तरीही राहुल गांधी दररोज पदयात्रा करत आहेत, त्यांच्यासोबत आम्हीही निघालो आहोत’, असे खन्ना म्हणाल्या.

हेही वाचा… काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर असतील ‘ही’ पाच आव्हाने

हिमाचल प्रदेशच्या आरती निर्मोही यांनाही दिग्विजय सिंह यांनी विचारले होते, ‘तुमच्या राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे, तुम्हाला यात्रेत सामील होणे जमेल का?’… मी पहाडी आहे, मला चालण्याचा कधी त्रास होत नाही. पायाला जखमा झाल्या तरी मी काश्मीरपर्यंत पदयात्रा करणार. नोव्हेंबरमध्ये माझ्या वडिलांचे वर्षश्राद्ध आहे पण, माझ्या आईने मला सांगितले की, तू यात्रा पूर्ण करूनच घरी परत ये, असे निर्मोही सांगत होत्या. आंध्र प्रदेशमधून फक्त प्रदेश काँग्रेसच्या सदस्य पद्मश्री सुनकरा यांची निवड झालेली आहे. ‘मी ठणठणीत आहे, यात्रा पूर्ण करायला सक्षम आहे. पहिल्या दिवसापासून मी पदयात्रेत आहे, काश्मीरपर्यंत पोहोचणार’, असा निर्धार पद्मश्रींनी व्यक्त केला.

हेही वाचा… ‘भारत जोडो’ यात्रेमुळे संघाचीही भाषा बदलू लागली! – काँग्रेसचे माध्यमविभाग प्रमुख जयराम रमेश यांचे मत

‘काही वेळेला प्रसाधनगृह मिळत नाही मग, लोकांच्या घरात जाऊन तिथल्या सुविधांचा वापर करावा लागतो. मग, लोक विचारपूस करतात, गप्पा मारतात. त्यातून ऋणानुबंध तयार होतो. ते फोन करून आमच्या तब्येतीची चौकशी करतात, यात्रा कुठे पोहोचली हे विचारतात’, असे खन्ना यांनी सांगितले. खन्नांना दक्षिणेकडील भाषा समजत नाहीत. पण, लोकांशी संवाद साधण्यात अडचण आली नाही, असे त्या म्हणाल्या. ‘आम्ही हावभावाने बोलतो. लोक काय म्हणतात हे कळते. त्यांच्यासोबत काहींना तोडकी मोडकी हिंदी येते, मग, ते त्यांना जमेल तसे आमचे म्हणणे आपापल्या भाषेत पोहोचवतात. शिवाय, यात्रेकरू देशाच्या विविध राज्यांतून आलेले आहेत. त्या-त्या राज्यांतील यात्रेकरूंची मदत घेऊन लोक काय म्हणत आहेत, ते समजून घेतो. लोकांचे प्रेम आम्हाला मिळत आहे, हे महत्त्वाचे’, अशा शब्दांत खन्ना यांनी लोकांकडून यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सांगितले.

हेही वाचा… ‘भारत जोडो’ यात्रेत अराजकीय चर्चेतून राजकीय पेरणी?

‘इंदिरा गांधींचा नातू येतोय, असे म्हणत लोक स्वागत करत आहेत. एका शेतकरी कुटुंबातील मुलगी आपल्या वडिलांना सांगत होती, राहुल गांधी आपल्या भागात येणार आहेत. त्यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. ही मुलगी आठ किमी चालत राहुल गांधींना भेटायला आली होती. असे अनेक भावनिक अनुभव मिळाले. राहुल गांधींना पप्पू म्हणून बदनाम केले गेले पण, या यात्रेनंतर त्यांची प्रतिमा पूर्ण बदलून जाईल’, असा विश्वास पद्मश्री सुनकरा यांना वाटतो.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are rahul gandhi digvijay singh still walking people ask questions to participants of bharat jodo yatra print politics news asj