-सुहास सरदेशमुख

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बंडखोर अशी बिरुदावली लागलेल्या मराठवाड्यातील आठपैकी चार आमदारांना मंत्री होण्याचे वेध लागले आहेत. औरंगाबादमध्ये मंत्र्यांची संख्या अधिक होऊ शकेल असे गृहीत धरून मंत्री पदाचा कोटा लोकसभा मतदारसंघनिहाय ठरविण्याचाही युक्तिवाद घडवून आणण्याची शक्कल लढविली जात आहे.

संदीपान भुमरे व अब्दुल सत्तार हे मंत्री शिंदेगटात सहभागी झाल्याने त्यांचा पदांवरील दावा समर्थकही मान्य करत आहेत. यामध्ये शिंदेगटात आक्रमकपणे शिवसेना पक्ष प्रमुखांच्या कार्यशैलीवर टीका करणाऱ्या संजय शिरसाट यांचीही मंत्री म्हणून वर्णी लागू शकते असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. एकाच जिल्ह्यात अधिक मंत्री पदे जाण्याची शक्यता असल्याने मंत्री म्हणून वर्णी लावताना लोकसभा मतदारसंघ हा निकष मानून विचार केला जावा असाही युक्तिवाद समर्थक कार्यकर्त्यांकडून मांडला जात आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील संदीपान भुमरे व सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची गणना जालना लोकसभा मतदारसंघातून होऊ शकेल. शिंदेगटातील भूम-परंडा मतदारसंघाचे तानाजी सावंत यांचाही मंत्रीपदाचा दावा अधिक भक्कम असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. शिवसेनेमध्ये मंत्री होता न आल्याने त्यांनी ‘मातोश्री’ वर जाहीर नाराजी व्यक्त केली हेाती. त्यामुळे ते असतीलच असे सांगण्यात येत आहे.

औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्यांना मंत्री पदे येऊ शकतील, असा कयास बांधला जात आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठवाड्यात पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर हे मंत्री होते. यातील पंकजा मुंडे आता विधिमंडळाच्या सदस्य नाहीत, मात्र उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यानंतर परळी मतदारसंघातून या वेळी कोणताही नकारात्मक सूर उमटलेला नाही. राज्यमंत्री म्हणून अतुल सावे यांनीही कारभार पाहिला होता. त्यामुळे त्यांचे समर्थकही मंत्री म्हणून वर्णी लागेल, असा दावा करत आहेत. सामाजिक समीकरणाचा विचार करता कोण मंत्री होऊ शकेल याची गणिते मांडली जात आहेत. विधिमंडळ निवडणुकीपूर्वी आवर्जून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या काही आमदारांनाही स्थान मिळू शकेल असे सांगण्यात येत आहे. तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनीही पूर्वी राज्यमंत्री हे पद सांभाळले होते. ते उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजपचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यास दोन मंत्री मिळू शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Story img Loader