मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक गटात सहभागी होण्यापूर्वी संभ्रमात असणाऱ्या अर्जुन खोतकर यांची अब्दुल सत्तार यांनी समजूत काढली असून खोतकर आणि माजी मंत्री सुरेश नवले सिल्लोड येथे होणाऱ्या मेळाव्यात जाहीर प्रवेश करणार आहेत. खोतकर यांच्या संभ्रम कालावधीमध्ये सत्तार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. रविवारी होणाऱ्या मेळाव्यातून औरंगाबाद व जालना या दोन्ही जिल्ह्यातील राजकारणावर आपलाच वरचष्मा राहील, असे प्रयत्न सत्तार यांच्याकडून केले जात असून तेच या दोन जिल्ह्यात मुख्यमंत्री समर्थकांची बांधणी करतील असे चित्र राजकीयपटावर रंगविले जात आहे.
या प्रक्रियेविषयी बोलताना सत्तार म्हणाले, ‘ खोतकर यांची समजून काढण्यासाठी दिल्ली येथे गेलो होतो. सिल्लोड येथील मेळाव्यात ते शिंदे गटात समर्थकांसह जाहीर प्रवेश करणार आहेत. याच मेळाव्यात बीड जिल्ह्यातील सुरेश नवलेही शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांना ताकद देताना जालना व औरंगाबाद जिल्ह्यात आपलाच पगडा राहावा, असे सत्तार यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कोणालाही मंत्री करा पण जिल्ह्यातील व्यक्तीलाच पालकमंत्री करावे अशीही त्यांची मागणी आहे. ते सांगतात, ज्या व्यक्तीला जिल्ह्याच्या विकासाचा जिव्हाळा वाटेल, अशा व्यक्तीला आता पालकमंत्रीही करायला हवे.
हेही वाचा- विचित्र आरक्षण सोडतीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात उलथापालथ
मतदारसंघावर कमालीची पकड असल्याने सत्तार राजीनामा देऊन पुन्हा निवडून यायला तयार आहेत. त्यासाठी ३१ जुलै रोजी राजीनामा देण्याची परवानगी मागण्याची तयारी असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. रविवारी होणाऱ्या मेळाव्यात सिल्लोड मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच सोयगावमधील १७ नगरपंचायतीचे सदस्य आता शिंदे गटात सहभागी होणार आहेत. बंडखोरीनंतर सिल्लोड मतदारसंघात शिवसेना नेत्यांचे अवसान गळल्यासारखे वातावरण आहे. तेथे त्यांना मेळावाही घेता आलेला नाही.
सत्तार काँग्रेसमध्ये असताना त्यांचे समर्थक काँग्रेसकडे वळलेले होते. गेली अडीच वर्षे त्यांचे समर्थक शिवसेना नेत्यांचे स्वागत करत होते. आता मात्र ते शिंदे यांच्या पाठीशी उभे राहतील, असा सत्तार यांना विश्वास आहे. ते म्हणाले, खरे तर सिल्लोड मतदारसंघात ‘ सत्तारसेना’ हेच सूत्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासासाठी मोठा निधी दिला असून १०६० कोटी रुपयांचे वॉटरग्रीड, नगरपरिषदेच्या अत्याधुनिक शाळेचे उद्घाटन असे विविध कार्यक्रम सिल्लोड येथे ठेवण्यात आले आहेत. बाळासाहेब ठाकरे उद्यान लोकार्पण सोहळाही होणार आहे.
होही वाचा- महिन्याभरानंतरही फक्त मुख्यमंत्री आणि बिनखात्याचे उपमुख्यमंत्री !
औरंगाबाद जिल्हा प्रशासनावर पकड असावी असा प्रयत्न सत्तार यांच्याकडून केला जात होताच. आता खोतकर यांची मनधरणी करत त्यांचा जाहीर प्रवेश घडवून आणण्यातही सत्तार यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र त्यांनी निर्माण केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी कार्यकर्ते बांधणीत आपण पुढाकार घेत आहोत, हे सांगायला ते विसरत नाहीत. जालना लोकसभा मतदारसंघाचे खोतकर हे उमेदवार असावेत असे सत्तार यांचे प्रयत्न गेल्या काही दिवसापासून होते. शिवसेनेमध्ये मंत्री असताना मराठवाड्यात दौरा करताना खोतकर आपल्याबरोबर असावेत असे प्रयत्न त्यांनी केले होते. तशी परवानगीही त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळविली होती. त्यामुळे औरंगाबाद व जालना दोन्ही जिल्ह्यात पकड मजबूत करण्यासाठी सत्तार यांचे प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच मराठवाड्यात येणार असल्याने मराठवाड्याचे प्रश्नही त्यांच्यासमोर मांडण्याची तयारी सुरू झाली आहे. औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यात सत्तार हेच राजकीय वीण बांधू शकतात, असा संदेश देत रविवारी होणाऱ्या सिल्लोड येथील मेळाव्याची तयारी केली जात आहे.