पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हा सर्वात मजबूत पक्ष आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या मजबुतीकरणासाठी नव्याने पक्ष बांधणी सुरु केली आहे. ज्या नेत्यांनी यापूर्वी तृणमूल काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन इतर पक्षांत प्रवेश केला आहे त्यांना परत पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
अर्जुन सिंह स्वगृही परतले
२०१९ मध्ये लोकसभा आणि २०२१ मधील विधानसभेच्यापूर्वी ज्या नेत्यांनी भाजपात प्रवेश करण्यासाठी तृणमूल काँग्रेस सोडली अश्या नेत्यांना परत पक्षात आणण्यावर भर देण्यात आला आहे. भाजपासोडून पुन्हा तृणमूलमध्ये परतणाऱ्या नेत्यांपैकी एक महत्वाचे नाव म्हणजे अर्जुन सिंह. भाजपाचे उपाध्यक्ष आणि बरॅकपूरचे भाजपाचे खासदार अर्जुन सिंह स्वगृही परतले आहेत.
तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यलयात आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत अर्जुन सिंह यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये लोकसभा आणि २०२१ मध्ये विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी भाजपात जाण्यासाठी पक्ष सोडलेल्या नेत्यांपैकी तृणमूल काँग्रेसमध्ये परतणारे अर्जुन सिंह हे सर्वात मोठे नेते आहेत.
यापूर्वी स्वगृही परतलेले नेते
२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या दणदणीत विजयाच्या एका महिन्यानंतर लेफ्टनंट मुकुल रॉय यांनी भाजपाचा राजीनामा दिला आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या जुन्या पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ राजीव बॅनर्जी, जॉयप्रकाश मुजुमदार, बाबुल सुप्रीयो आणि इतर अनेक नेत्यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार सिंह यांची तुलना केवळ मुकुल रॉय यांच्याशी केली जाऊ शकते. मुकुल रॉय आधी पक्षात परतले आणि आता त्यांच्या पाठोपाठ अर्जुन सिंह. हा भाजपासाठी मोठा धक्का आहे असं तृणमूल कॉंग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
अर्जुन सिंह यांची कारकीर्द
अर्जुम सिंह यांचे वडील सत्यनारायण सिंह हे बरॅकपुरमधील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते होते. अर्जुन सिंह हे सर्वलर्थं १९९५ मध्ये भाटपारा नगरपालिकेत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. १९९८ मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेसाठी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली आणि ममता यांच्यासोबत जोडले गेले. सिंह यांचे कुटुंब मूळचे बिहारचे. त्यांनी बिहारी आणि उत्तर भारतीय बहुल भाग असणाऱ्या उत्तर परगणा भागात तृणमूल काँग्रेसची उत्तम बांधणी केली. २००१ पासून सतत ३ टर्म ते भाटपारा येथून ते तृणमूल काँग्रेसचे आमदार झाले.
अर्जुन सिंह यांच्या पक्षातील प्रवेशाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. सिंह यांच्या प्रवेशाच्यावेळी ममता बॅनर्जी उपस्थित नव्हत्या. ममता यांच्यासोबतच पक्षाचे इतर काही महत्वाचे नेते अनुपस्थित होते. याउलट अर्जुन सिंह यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा अमित शहा आणि जे.पी नड्डा हे दोघेही उपस्थित होते.