भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाला संपवतो, अशी टीका नेहमी या पक्षाचे मित्रपक्षच करीत असतात. ज्या पक्षाचा आधार घेऊन भाजपने राज्यात जनाधार वाढवला त्या शिवसेनेलाच संपवण्याचा या पक्षाने घातलेला घाट हा सर्वश्रूत आहे, त्यामुळेच भाजपवर मित्र पक्ष संपवण्याचा आरोप अधिक होऊ लागला आहे. असे असले तरी त्यांना नवीन मित्रांची कमी नाही, अनेक पक्ष सत्तेच्या लोभापोटी भाजपसोबत येतात. राष्ट्रवादी अजित पवार गट हा त्यापैकीच एक. या पक्षाने विदर्भात स्वपक्षाच्या विद्यमान आमदाराला डावलून भाजपच्या माजी मंत्र्याला उमेदवारी दिली. त्याबदल्यात भाजपने राष्ट्रवादीला काय दिले तर धोका.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे हे विद्यमान आमदार आहेत. पक्षफुटीनंतर ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटली. तेथे राष्ट्रवादीकडून पहिला दावा हा चंद्रिकापुरेंचाच होता. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल असेच वाटत होते. पण अजित पवार यांनी भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांना पक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी तिकीट दिली. बडोलेंना तिकीट देण्याबाबत राष्ट्रवादीवर दिल्लीतून दबाव होता, असे या पक्षाचे वरिष्ठ नेते सांगतात. पण या त्यागाची जाण भाजपने राखली नाही, उलट अजित पवार यांची कोंडी कशी करता येईल, याच दृष्टीने भाजपने विदर्भात पावले उचलली. वरुड-मोर्शी, अहेरी, काटोल ही त्याची उदाहरणे मानता येईल.

हेही वाचा – गोंदियात गोपालदास अग्रवाल विरुद्ध विनोद अग्रवाल यांच्यात लक्षवेधी लढत, तिसऱ्यांदा समोरासमोर

अमरावती जिल्ह्यात मोर्शी-वरूड मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्मान आमदार आहेत. त्याच्या विरोधात भाजपने उमेदवार दिला आहे. काटोलची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातील होती, तेथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत अपेक्षित होती पण भाजपने तेथेही स्वत:चा उमेदवार दिला. हेच अहेरीत झाले. येथे अजित पवार यांच्या गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम उमेदवार आहे, त्यांच्या विरोधात शरद पवार गटाने धर्मरावबाबांची मुलगी भाग्यश्रीला रिंगणात उतरवले आहे. अत्यंत चुरशीची होऊ घातलेली ही लढत अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची असली तरी येथे त्यांना भाजपची साथ नाही. येथे भाजपचे माजी मंत्री अंम्बरिशराव आत्राम यांनी बंडखोरी केली. विशेष म्हणजे भाजपची संपूर्ण यंत्रणा त्यांच्या पाठीशी आहे.

हेही वाचा – पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद ; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देशाचा विकास’; पुण्यातील सभेत विधान

भाजपच्या दबावात अजितदादा ?

अजितदादा भाजपसोबत गेल्यावर त्यांच्यावर टीका होण्याची सुरुवात नागपूरच्या ‘परिवारातून’च झाली होती. नंतर त्याला व्यापक रुप मिळाले. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराला बाहेर न पडणाऱ्यांनी विदर्भात महायुतीच्या पराभवास अजित पवार यांच्याशी युती हे कारण असल्याचे सांगितले होते. आजही भाजप व परिवारातील संघटनांमध्ये सर्वाधिक टीका अजित पवारांवर केली जाते. असे असतानाही अजित पवार यांची भूमिका भाजपप्रती मवाळ असल्याचे दिसून येते. काटोल मतदारसंघात शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या नामसाधर्म्य व्यक्ती शोधणे, त्यांचा उमेदवारी अर्ज सादर करणे आणि त्यासाठी अजित पवार यांना बी-फॉर्म देण्यास बाध्य करणे या भाजपच्या खेळीला अजित पवार यांनीही मान्यता देणे ते भाजपच्या दबावात असल्याचे लक्षण मानले जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjuni morgaon constituency ajit pawar group manohar chandrikapure rajkumar badole bjp pressure on ajit pawar print politics news ssb