गडचिरोली : विधानसभा निवडणूक निकालात सर्वत्र महायुतीचा बोलबाला असताना गडचिरोलीतील आरमोरी मतदारसंघात काँग्रेसने मुसंडी मारल्याने भाजपला धक्का बसला आहे. गेल्या दहा वर्षांपासून ही जागा भाजपच्या ताब्यात होती. याठिकाणी भाजपचे असलेले वर्चस्व बघता यंदाही मावळते आमदार कृष्णा गजबे यांना संधी मिळेल असे वाटत होते. परंतु काँग्रेसने ही जागा पटकावल्याने जिल्ह्यावरील महायुतीच्या एकहाती वर्चस्वाला खिंडार पडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या दशकभरापासून गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा महायुतीच्या ताब्यात होत्या. यापैकी आरमोरी, गडचिरोलीत भाजप तर अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्राबल्य होते. २३ नोव्हेंबरला लागलेल्या निकालात आरमोरीत भाजपाला धक्का देत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढविणाऱ्या मतमोजणीनंतर याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार रामदास मसराम निवडून आले. गडचिरोलीत भाजपने विद्यमान आमदारांचा पत्ता कट करून डॉ. मिलिंद नरोटे या तरुण चेहऱ्याला संधी दिली होती. त्यांनी विजय संपादन करून पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवला. तर अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी अपेक्षित यश मिळवले. त्यामुळे युती-आघाडीत दोन विरुद्ध एक असा निकाल लागला. सहकार क्षेत्रातील मातब्बर नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोरेड्डीवार कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या आरमोरीत मात्र, यावेळी सर्व अंदाज चुकले. उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर पाहिल्या यादीत आरमोरीचे नाव होते. भाजपची सर्वात सुरक्षित जागा म्हणून याकडे बघितले जायचे. याठिकाणी प्रचारासाठी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा घेतल्या. त्यामुळे गजबे निवडून येणार असा कायास बांधला जात होता. परंतु काँग्रेसने ही जागा ताब्यात घेत राजकीय वर्तुळाला चांगलाच धक्का दिला आहे. यामुळे जिल्ह्यात एक दशकानंतर विधानसभेत काँग्रेसचे खाते उघडले आहे.

हेही वाचा – ‘लाडकी बहीण’ प्रभाव या मतदारसंघात का चलला नाही ?

हेही वाचा – अकोला जिल्ह्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व, ‘अकोला पश्चिम’मध्ये बंडखोरीचा भाजपला मोठा फटका; दोन दशकानंतर जिल्ह्यात पंजाला संधी

प्रियांका गांधीची सभा आणि गोवारी समाजाचा रोष नडला

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सुरुवातीपासूनच भाजपने प्रचारात आघाडी घेतली होती. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यासारख्या मोठे नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या. सोबत पोरेड्डीवार कुटुंबाचे पाठबळ असल्यावरही गजबे जिंकू शकले नाही. यामागे मतदानाच्या तीन दिवसांपूर्वी झालेली प्रियंका गांधी यांची सभा आणि गोवारी समाजाचा रोष कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळेच भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या आरमोरीत काँग्रेसने घवघवीत यश मिळविले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Armory assembly congress ramdas masram won bjp shock print politics news ssb