अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने पुन्हा एकदा बहुमत प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाही तीन जागा प्राप्त करता आल्या आहेत. अरुणाचल विधानसभेच्या ६० पैकी ४६ जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. याआधीच्या निवडणुकीमध्ये ४१ जागांवर विजयी झालेल्या भाजपाने आता ४६ जागा प्राप्त केल्याने त्यांच्या कामगिरीत वाखाणण्याजोगी सुधारणा झाली आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये सध्या भाजपाचा राजकीय प्रभाव इतर पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. याआधी अशा प्रकारचे निर्णायक बहुमत १९९९ साली काँग्रेस पक्षाला मिळाले होते. तेव्हा काँग्रेसने ६० पैकी ५३ जागा जिंकल्या होत्या.
भाजपाच्या मतांमध्ये विक्रमी वाढ
भाजपाच्या एकूण मतांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये ५०.८६ टक्के मते मिळवणाऱ्या भाजपाला या निवडणुकीमध्ये ५४.५७ टक्के मते प्राप्त झाली आहेत. भाजपाला एकतर्फी विजय मिळणे हे या निवडणुकीचे एक प्रमुख वैशिष्ट्य असले तरीही राज्यातून काँग्रेस पक्ष पूर्णपणे नेस्तनाबूत होणे हे या निवडणुकीचे दुसरे प्रमुख वैशिष्ट्य आहे. २०१६ सालापर्यंत काँग्रेसची राज्यातील स्थिती चांगली होती. मात्र, पेमा खांडू यांनी ४३ आमदारांसह पक्षाला रामराम केल्यानंतर पक्षाची स्थिती फारच बिघडत गेली.
हेही वाचा : भाजपाला एकहाती सत्ता मिळवून देणारे पेमा खांडू आहेत तरी कोण?
काँग्रेसला मिळाली फक्त एकच जागा
२०१९ साली चार जागांवर विजय मिळवलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत पश्चिम अरुणाचलमधील बामेंग या एकाच मतदारसंघात विजय प्राप्त करता आला आहे. २०१९ साली काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी १६.८५ टक्के होती, ती आता घसरून ५.५६ टक्क्यांपर्यंत आली आहे. अगदी चांगले उमेदवार उभे करण्यासाठीही काँग्रेसला संघर्ष करावा लागला. सरतेशेवटी काँग्रेसने फक्त १९ जागांवरच आपले उमेदवार उभे केले.
भाजपाचा दहा जागांवर बिनविरोध विजय
मुख्यमंत्रिपदावर कुणाला बसवले जाईल, याबाबतचा निर्णय अद्याप भाजपाने जाहीर केलेला नाही. मात्र, पेमा खांडू हेच तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, अशी शक्यता अधिक वर्तवली जात आहे. मतदानापूर्वीच दहा मतदारसंघांमध्ये बिनविरोध जिंकल्यामुळे भाजपाचा या निवडणुकीत वरचष्मा असल्याचे तिथेच सिद्ध झाले होते. मुख्यमंत्री पेमा खांडू यांची मुक्तो मतदारसंघातून, तर उपमुख्यमंत्री चौना मेन यांची चौखम मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही तीन जागा
“गेल्या आठ ते दहा वर्षांच्या काळात अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या विकासकामांचे प्रतिबिंब म्हणजे हा विजय आहे”, असे मत पेमा खांडू यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) पाच जागा जिंकल्या असून हा पक्ष राज्यामध्ये दुसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (एनसीपी) तीन मतदारसंघांमध्ये विजय मिळवला आहे. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलने (पीपीए) दोन जागा जिंकल्या आहेत. तीन अपक्षांनीही या निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे. पीपीएचे विजयी दोन उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि एनपीपी पक्षाचे प्रत्येकी एक उमेदवार भाजपाकडून निवडणूक लढवू इच्छित होते. मात्र, त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष अथवा इतर पक्षांकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधातच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल २८ उमेदवारांना पक्षाबाहेर काढण्यात आले होते. निवडून आलेले तीनही उमेदवार त्यापैकीच आहेत. एनपीपी आणि एनसीपीचे (अजित पवार गट) विजयी उमेदवार हे भाजपाप्रणित एनडीए आघाडीचेच सदस्य आहेत. मात्र, निवडणुकीनंतर भाजपा एकट्याच्या जोरावर सत्ता स्थापन करणार असून इतर पक्षांना सरकारमध्ये सामील करून घेणार नसल्याचे भाजपाच्या नेत्यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी फॅक्टरचा प्रभाव
बिनविरोध जिंकलेल्या १० उमेदवारांपैकी एक असलेल्या मुचू मिठी यांनी म्हटले की, “गेल्या पाच वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी चार ते पाच वेळा अरुणाचलमध्ये आले आहेत. याआधी क्वचितच एखाद्या पंतप्रधानाने आमच्या राज्याला भेट दिली होती. आमच्या राज्यामधून लोकसभेचे फार उमेदवार निवडले जात नाहीत, त्यामुळे राज्याला फारसे महत्त्व दिले जात नाही. मात्र, तरीही राज्याचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन भाजपाने राज्याला अधिक महत्त्व दिले आहे. राज्यातील भाजपाचे संघटनही मजबूत असून केंद्र सरकारने राज्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. विशेषत: रस्ते बांधणी आणि हवाई उड्डाणाच्या क्षेत्रात यापूर्वी एवढी गुंतवणूक झालेली नव्हती”, असेही ते म्हणाले.
निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे इतर पक्षातील अनेक आमदार भाजपामध्ये प्रवेश करू लागले होते. तेव्हाच राज्यातील निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले होते. अनेकांना भाजपाकडून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची आशा होती. अरुणाचल प्रदेशमधील राजीव गांधी विद्यापीठात राज्यशास्त्र शिकवणाऱ्या प्रा. नानी बाथ यांनी यासंदर्भात म्हटले की, “अरुणाचलच्या राजकारणामध्ये कोणत्याही नेत्याला विरोधी बाकांवर बसायची इच्छा नाही.” त्यामुळेच भाजपाने ५५ जागांवर विजय मिळवला आहे. खुद्द काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते लोम्बो तयेंग यांनीच मार्च महिन्यामध्ये भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. त्यानंतर भाजपा प्रवेशाची चढाओढ सुरूच राहिली.
हेही वाचा : एक्झिट पोल्सवर विश्वास नाही; आम्ही २९५ च्या पार जाऊ – इंडिया आघाडीचा दावा
आम्ही निराश, मात्र नाउमेद नाही – काँग्रेस
याबाबत काँग्रेसने आपले मत मांडले आहे. “आम्हाला ५० हून अधिक जागांवर निवडणूक लढवायची होती. मात्र, भाजपाने आमचे विधिमंडळ पक्षनेते आणि माजी केंद्रीय मंत्री निनॉन्ग एरिंग यांना आपल्या बाजूने ओढून घेतले, यामुळे काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये निराशा आणि हतबलता पसरली. तरीही आम्ही ३५ जागांवर उमेदवार उभे केले. मात्र, भाजपाने त्यामधील दहा जणांबरोबर वाटाघाटी करून त्यांना माघार घ्यायला भाग पाडले. त्यानंतर २५ जणांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यातीलही सहा जणांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे हा निकाल काही जनादेश नाही. विरोधी पक्षांना घाबरवून तसेच कमकुवत करून ही निवडणूक लढवली गेली आहे”, असे मत काँग्रेसचे राज्य सरचिटणीस कोन जिरजो जोथम यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना मांडले. अरुणाचल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही नक्कीच निराश आहोत, पण नाउमेद नाही. आम्ही पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण करू आणि आगामी काळात संघटना बांधणीवर काम करू.”