वर्धा : भाजपमधील सर्वात चर्चित व राज्यात गाजलेल्या बंडखोरीवर आज अखेर पडदा पडला. भाजपचे आर्वीचे विद्यमान आमदार व अधिकृत उमेदवाराविरोधात अर्ज दाखल करीत पक्षात वादळ निर्माण करणारे दादाराव केचे यांनी सोमवारी अखेर आपला अर्ज परत घेतला. त्यामुळे पक्षाचे अधिकृत उमेदवार सुमित वानखेडे तसेच पक्षनेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकल्याचे दिसून आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज केचे हे त्यांचे सहकारी व आर्वी बाजार समितीचे अध्यक्ष संदीप दिलीप काळे यांच्यासोबत निवडणूक कार्यालयात पोहचले. त्यानंतर त्यांनी अर्ज परत घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. लगेच लोकसत्ता सोबत बोलतांना ते म्हणाले, पक्ष निर्णयचा आपण सन्मान केला आहे. त्यांनीही मला सन्मानाने वागविले. संघटन महत्वाचे. ते मजबूत तर आम्ही. अन्यथा काहीच नाही. आता कारंजा तालुक्यात तीन सभेसाठी निघालो आहे. उमेदवार वानखेडे पण सोबतच आहे. माझे त्यांचे काही व्यक्तिगत वैर नाहीच. पक्षात स्पर्धा असतेच. पण त्यात मार्ग पण काढावा लागतो. पक्षनेते व गृहमंत्री अमित शहा यांनी धीर धरण्याचा सल्ला दिला. तो मी मानला. आता वानखेडे यांच्या विजयासाठी प्रयत्न सूरू झाले आहे. १९८३ पासून आर्वी मतदारसंघात मी कमळ फुलविणे सूरू केले. आता सर्वत्र हीच फुले दिसतात. आमचा विजय पक्का समजा. कारण मजबूत संघटन व एकाच घरात लोकं खासदार, आमदार देणार नाही. आमच्यासाठी विरोधी उमेदवार फायद्याचाच ठरणार, अशी ग्वाही दादाराव केचे यांनी दिली.

आणखी वाचा-Manoj Jarange Patil in Assembly Election : मनोज जरांगे यांच्या निर्णयाने उमेदवार नाराज

केचे यांचे बंड विविध वळणे घेत अखेर अमित शहा यांच्या दारी थेट अहमदाबाद येथे थंडावले. चार्टर्ड विमानाने पक्षातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या नेत्याकडे पोहचून माघार घेणारे केचे हे भाजपचे राज्यातील एकमेव असे बंडखोर ठरले आहे.अहमदाबाद येथून केचेसह सुधीर दिवे व संदीप काळे हे नागपूरमार्गे थेट भाजप जिल्हा कार्यालयात पोहचले होते. तेथे ते म्हणाले, “उमेदवारी परत घेत आहे याचा अर्थ मी संपलो असा घेऊ नका. राजकारणातील घडामोडी मनाला लावून नं घेता जो चालतो तो पुढेच जातो.निवडणुकीच्या राजकारणात त्यांनी इतिहास रचल्याचा बोलबाला झाला आहे.” आता केचे हे अधिकृत उमेदवार सुमित वानखेडे यांची कशी मदत करणार, याकडे आर्वी मतदारसंघातील सर्वच लक्ष ठेवून असल्याचे म्हटल्या जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvi assembly constituency bjp dadarao yadavrao keche withdraws from the maharashtra assembly election 2024 print politics news mrj