वर्धा : आर्वी मतदारसंघात मयूरा अमर काळे विरुद्ध सुमित वानखेडे, असा दुहेरी सामना आता कुटुंबाच्या थेट आरोप-प्रत्यारोपाने गाजू लागला आहे. खासदार अमर काळे यांनी पत्नी मयूरा यांच्यासाठी उमेदवारी खेचून पक्षातील विरोधकांवर मात केली. ४० वर्षांची काँग्रेसची साथ सोडून त्यांनी सासुरवाडीचा प्रभाव असणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षात ऐनवेळी उडी घेतली. हे कसले निष्ठावंत म्हणून तिकीट इच्छुक सर्व चारही उमेदवारांनी त्यांच्यावर खुला बहिष्कार टाकला. आता काळे दाम्पत्य अस्तित्वाची लढाई लढत असल्याचे म्हटल्या जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसरीकडे, भाजप उमेदवार सुमित वानखेडे व दादाराव केचे यांनी ही लढाई निकराची केली आहे. मयूरा काळे यांना उत्तर म्हणून सुमित वानखेडे यांच्या अर्धांगिनी अ‍ॅड. क्षितिजा या पण भाषणे गाजवत आहेत. माझं माहेर, सासर आर्वीच. इथेच शिकली, मोठी झाली. लहान होती तेव्हा जसे आर्वी होते तसेच आताही आहे. नावालाच शहर मात्र एक मोठे खेडेच. एक मुख्य रस्ता लहानपणी पाहिला तोच एकच आता आहे. ४० वर्षांत शहरे कात टाकतात. पण येथे काहीच बदल नाही कारण विकास कामे शून्य. केवळ कुटुंबाचे भले, असा टोला क्षितिजा वानखेडे लगावतात. तर, मयुरा काळे लोकांना सांगतात की, आम्ही इथेच राहणार. मुंबईत जाऊन बसणार नाहीत. लोकांना अडचणीत आम्हीच मदतीस धावून जाणार. त्यावर हा खोटा प्रचार असल्याचे वानखेडे दाम्पत्य म्हणतात.

हेही वाचा – पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या चिमुरातील सभेची मतदारांमध्ये तुलनात्मक चर्चा

ज्याचे मूळ एकमेव घर इथेच आहे तो इथेच थांबणार. राज्यात ठिकठिकाणी घरे आम्ही बांधून ठेवली नाहीत. स्वतःसाठी अनेक घरे, पण इथल्या गरीब वर्गासाठी एकपण घरकुल कधी आणले का, असा सवाल वानखेडे प्रचारात करतात. त्याचे कारण लोकसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना काळे यांनी मुंबईत श्रीमंत वसाहतीत तीन फ्लॅट, नागपुरात डुप्लेक्स, आर्वीत बंगला व गावी फार्महाउस असल्याचे नमूद केले आहे. आता वर्धेत पण कार्यालयवजा घर झाले. त्यावरून वानखेडे यांचे आरोप होतात.

हेही वाचा – धामणगावात भाजप, काँग्रेसमध्‍ये वर्चस्‍वाची लढाई

दादाराव केचे यांच्यावर अन्याय केला म्हणून खासदार काळे आपल्या भाषणातून खिल्ली उडवतात. भाजपने खऱ्या नेत्यास वाऱ्यावर सोडल्याची टीका करतात. त्यावर वानखेडे यांचे प्रत्युत्तर असते की, केचे यांची काळजी पक्ष घेईलच. पण खासदार होताना व आता पत्नीसाठी काँग्रेसला एका मिनिटात सोडचिठ्ठी देणाऱ्या काळे यांनी निष्ठा सांगू नये. ज्या पक्षाने प्रतिष्ठा दिली, त्याच पक्षाला क्षणात विसरणारे काळे घरावर अजूनही काँग्रेस झेंडा ठेवून असणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा विचार करतात का, असा सवाल वानखेडे करतात. अशी जुगलबंदी आर्वीत सुरू आहे. काळे भाजपने काय केले विचारतात, तेव्हा ४० वर्षांत काळे कुटुंबाने आर्वीसाठी काय केले, असा प्रतिसवाल डागून चर्चेत येतात. कामे करायची असल्यास ती चार वर्षांत पण करता येतात, हे दाखवून दिले असल्याचे उत्तर क्षितिजा वानखेडे देत आहेत. विखूरलेले काँग्रेस गट विरुद्ध एकसंघ भाजप यापेक्षा पतीसाठी पत्नी विरुद्ध पत्नीसाठी पती हा सामना अधिक चर्चेत आला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvi constituency amar kale wife mayura kale campaign bjp sumit wankhede wife kshitija wankhede campaign print politics news ssb