वर्धा : महाविकास आघाडीत आर्वी विधानसभा मतदारसंघाची जागा ‘वादात’ सापडल्याने यावार दिल्ली दरबारी तोडगा काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात काँग्रेसची बैठक नुकतीच दिल्लीत झाली. जागावाटपात प्रामुख्याने राज्यातील १६ जागांबाबत वाद आहे, असे म्हटल्या जाते. यात आर्वी विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. काँग्रेसचे येथील माजी आमदार अमर काळे हे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार) कडून लढत खासदार झाले आहे. त्यांचा हा मतदारसंघ आता कोणाला जाणार, याची सर्वाधिक चर्चा होते.

काळे कुटुंबाचा गत ४० वर्षांपासून बालेकिल्ला राहिलेल्या आर्वीत आता अमर काळे यांच्याइतके तोडीचे नाव काँग्रेसकडे नाही. तसेच अमर काळे यांचा मतदारसंघ असल्याने आर्वी राष्ट्रवादीकडेच राहणार, तो सोडणार नाही असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निक्षून सांगितले होते. खुद्द काळे यांनीही यास दुजोरा दिला होता. मात्र आता आर्वीची परंपरागत जागा सोडू नये म्हणून काँग्रेस नेते आग्रही आहे. नेहमीप्रमाणे हिंगणघाट राष्ट्रवादी व उर्वरित वर्धा, देवळी, आर्वी क्षेत्र काँग्रेसने लढविण्याचा युक्तिवाद आहे. मात्र प्रथमच आर्वी मतदारसंघातात राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षांवर नवखा उमेदवार देण्याची वेळ आली आहे. ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्यास खासदार काळे यांच्या पत्नीचीच दावेदारी राहणार व एकाच कुटुंबात दोन जागा जाणार, हे कसे असा प्रश्न पुढे आला आहे. आर्वी हा नेहमी काँग्रेसचा गड राहिल्याचे १९८० पासून प्रथम शरद काळे व नंतर अमर काळे यांनी हा गड राखला. मात्र पुढे दोनवेळा पराभव झाला. आता अमर काळे हे खासदार झाल्याने या जागेवर काँग्रेसकडे नवा उमेदवार देण्याची संधी असल्याचे काँग्रेस नेते म्हणतात. मित्रपक्षानेही आर्वीसाठी आग्रही असू नये, अशी विनंती केल्या जाते. खासदार व संभाव्य आमदार एकाच कुटुंबातील असू नये म्हणून काँग्रेस नेत्यांनी विरोधही करणे सुरू केले आहे.

हेही वाचा – पवार ते पवार असा आमदार हिरामण खोसकर यांचा राजकीय प्रवास

हेही वाचा – काँग्रेसकडून विदर्भात सांगली प्रारुपाची पुनरावृत्ती? राष्ट्रवादीकडे असलेल्या काटोल मतदारसंघाकडे लक्ष

काँग्रेसतर्फे आर्वीतून लढण्यास इच्छुक असलेले अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या किसान शाखेचे समन्वयक शैलेश अग्रवाल हे म्हणाले की, आर्वी काँग्रेसनेच लढावी व मित्रपक्षाला सोडू नये, अशी भूमिका दिल्लीत मांडण्यात आली आहे. सहकारी पक्ष यास तयार नसल्यास आर्वीसह इतर वादग्रस्त समजल्या जाणाऱ्या जागांबाबत पक्षनेते राहुल गांधी यांनी पुढाकार घेण्याची विनंती आम्ही पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना भेटून केली आहे. आर्वीत लढणाऱ्या परंपरागत उमेदवाराने (अमर काळे) पक्ष सोडला. म्हणून जागाही त्यांच्याच पक्षासाठी सोडण्याचे अजिबात कारण नाही, अशी भूमीका मांडल्याचे शैलेश अग्रवाल म्हणाले.