पाटणा येथे विरोधकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत, तसेच आघाडीच्या शक्यतेवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, या बैठकीआधीच आम आदमी पार्टीने विरोधकांना अल्टिमेटम दिला आहे. तर, केंद्र सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाला काँग्रेसने आगामी अधिवेशनात विरोध न केल्यास, आम्ही वेगळा निर्णय घेऊ, असे आप या पक्षाने म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या याच भूमिकेवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आगामी संसदीय अधिवेशनाच्या अगोदर आम्ही याबातची भूमिका स्पष्ट करू. आताच यावर बोलणे योग्य नाही, असे खर्गे म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरोधकांच्या बैठकीला १६ पक्षांचे प्रमुख उपस्थित

आज (२३ जून) पाटणा येथील बैठकीला १६ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहिले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार या नेत्यांसह अन्य महत्त्वाचे नेतेही या बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीआधी खर्गे यांनी आम आदमी पार्टीच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली.

मल्लिकार्जुन खर्गे काय म्हणाले?

“मोदी सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाला विरोध करायचा की पाठिंबा द्यायचा हे संसदेच्या बाहेर ठरवले जाऊ शकत नाही. संसदेचे अधिवेशन सुरू होण्याआधी सर्व विरोधी पक्ष यावर विचारविनिमय करतील. त्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते ठरवले जाईल. याची कल्पना आम आदमी पार्टी, तसेच पाटणा येथे आलेल्या आप पक्षाच्या नेत्यांनादेखील आहे. या प्रकरणाला उगीचच प्रसिद्धी का दिली जात आहे, हे मला समजत नाही,” असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. तसेच १८ ते २० विरोधी पक्ष एकत्र येतील. त्यानंतरच मोदी यांनी जारी केलेल्या अध्यादेशावर काय भूमिका घ्यायची हे ठरवले जाईल. त्यामुळे आताच काहीही सांगणे योग्य नाही. आगामी संसदीय अधिवेशनाच्या तोंडावर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही खर्गे यांनी सांगितले.

मोदी सरकारच्या अध्यादेशाला विरोध का केला जात आहे?

दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील नोकरशाहीवरील अधिकारासंदर्भात काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला होता. कायदे तयार करणे व प्रशासनावर नियंत्रण ठेवणे याबाबतचा अधिकार दिल्ली सरकारला आहे, असे न्यायालयाने म्हटले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदी सरकारने अध्यादेश जारी करून, नोकरशाहीवरील अधिकार पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे घेतले. याच कारणामुळे आम आदमी पक्ष आक्रमक झाला आहे. मोदी सरकारच्या या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी आप पक्ष विरोधकांचा पाठिंबा मागत आहे. काँग्रेसने मात्र आप पक्षाला पाठिंबा देण्यासंदर्भात अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. पाटणा येथील विरोधी पक्षांच्या बैठकीचै औचित्य साधून आम आदमी पार्टीने काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

पाटणा येथील बैठकीला कोण कोण उपस्थित?

पाटणा येथील बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, बिहारचे मुख्यमंत्री तथा संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, लालूप्रसाद यादव आदी नेते उपस्थित होते.

आगामी काळात भाजपा कोठेही दिसणार नाही : राहुल गांधी

दरम्यान, राहुल गांधी यांनी विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहण्याआधी एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. “आगामी काळात भाजपा कोठेही दिसणार नाही. भाजपाच्या नेत्यांनी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत खूप मेहनत घेतली. खूप प्रचार केला. मात्र, तेथे काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. आगामी काळात तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांत काँग्रेसचाच विजय होणार आहे. याच कारणामुळे मी विरोधकांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलो आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी देशातील सर्वच पक्ष एकत्र येणार आहेत” असे राहुल गांधी म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejariwal theatend congress ahead of opposition meeting mallikrjun kharge comment prd