२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी बाकावरील एकूण २८ पक्ष एकत्र आले आहेत. या आघाडीला विरोधकांनी इंडिया असे नाव दिले आहे. विरोधकांच्या या युतीत काँग्रेस तसेच आम आदमी पार्टी (आप) या दोन्ही पक्षांचा समावेश आहे. मात्र पंजाबमध्ये काँग्रेसचे आमदार सुखपालसिंग खैरा यांना २०१५ सालच्या एका ड्रग्ज तस्करीत अटक करण्यात आली आहे. याच कारणामुळे काँग्रेस आणि आप पक्षात आता वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी इंडिया आघाडी तसेच खैरा यांच्या अटकेवर आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही युतीचा धर्म पाळणार आहोत. इंडिया या आघाडीत आम्ही कायम राहणार आहोत, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
जागावाटप करण्यास उशीर का होत आहे?
“आप विरोधकांच्या इंडिया आघाडीबाबत वचनबद्ध आहे. आम्ही या आघाडीतून बाहेर पडणार नाही. आम्ही युतीचा धर्म पाळण्यासाठी वचनबद्ध आहोत,” असे अरविंद केजरीवाल म्हणाले. इंडिया आघाडीत अद्याप जागावाटप झालेले नाही. या जागावाटपाला उशीर का होत आहे? असा प्रश्न केजरीवाल यांना विचारण्यात आला. यावर बोलताना “जागावाटपाचे सूत्र लवकरच तयार होईल,” असे केजरीवाल यांनी सांगितले.
अद्याप पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा का नाही?
इंडिया आघाडीत सध्या एकूण २८ पक्ष आहेत. मात्र या आघाडीने अद्याप पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. याबाबतही केजरीवाल यांना विचारण्यात आले. “देशातील प्रत्येक नागरिकाला सशक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशातील १.४ अब्ज लोकांना आम्हीच पंतप्रधान आहोत, अशी व्यवस्था निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लोकांचे सक्षम बनवणे गरजेचे आहे,” असे केजरीवाल म्हणाले.
खैरा यांच्या अटकेवर दिली प्रतिक्रिया
आप पक्षाकडून सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. आप पक्षाने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. कायद्यानुसारच ही कारवाई करण्यात आली आहे, असे आप पक्षाने सांगितले. याच प्रकरणावर बोलताना “पंजाबच्या पोलिसांनी एका नेत्याला अटक केल्याचे वृत्त मला समजले. मात्र मला याबाबत अधिक माहिती नाही. त्यासाठी तुम्हाला पंजाब पोलिसांशी संपर्क साधावा लागेल,” असे केजरीवाल म्हणाले. तसेच “पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे तसेच आपचे सरकार ड्रग्जची तस्करी आणि व्यापार थांबवण्यास कटीबद्ध आहे,” असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
खैरा यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, पंजाब पोलिसांनी खैरा यांना चंदीगड येथून अटक केली. त्याआधी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानावर छापेमारी केली होती. २०१५ सालच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात ही अटक करण्यात आलेली आहे. त्यांना सध्या दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.