भारतीय जनता पक्षाने पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. देशातील आम आदमी पक्षाचे एकमेव लोकसभा सदस्य आणि जालंधरमधून लोकसभा निवडणूक २०२४ साठी पक्षाचे घोषित उमेदवार सुशील कुमार रिंकू यांनी बुधवारी संध्याकाळी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत दिल्लीत दुपारी चार वाजता सुशील रिंकू पक्षात सामील झाले. यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप पुरीही उपस्थित होते. रिंकू यांच्याबरोबर आम आदमी पक्षाच्या जालंधर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार शीतल अंगुरल यांनीही भाजपात प्रवेश केला. सुशील रिंकू भाजपामध्ये दाखल झाल्याने लोकसभा निवडणुकीत जालंधरच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. त्याचा परिणाम पंजाबच्या इतर जागांवर पाहायला मिळतोय. डिसेंबरमध्ये विक्रमी संख्येने विरोधी खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले होते, त्यात सुशील कुमार रिंकू यांचाही समावेश होता. जेव्हा संसदेच्या सभागृहात दिल्ली सेवा विधेयकावर चर्चा सुरू होती, तेव्हा सभागृहाच्या वेलमध्ये येऊन त्यांनी गोंधळ घातला होता. तसेच काही कागद फाडून सभापती ओम बिर्ला यांच्या दिशेने फेकले होते. निलंबनानंतर त्यांनी संसदेसमोर ठाण मांडून निलंबनाचा निषेध केला होता. आता तेच रिंकू भाजपामध्ये दाखल झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा