नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणूक पुढील महिन्यात, तर दिल्ली विधानसभा निवडणूक पुढील वर्षाच्या सुरुवातीला होत आहे. अशा वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा असलेले अरविंद केजरीवाल यांची जामिनावर सुटका झाल्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे बळ मिळेल अशी प्रतिक्रिया पक्षाच्या नेत्यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरियाणामध्ये आपचा एकही आमदार किंवा खासदार नाही. त्या राज्यात ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची काँग्रेसबरोबर आघाडी होऊ शकली नाही. मूळचे हरियाणाचे असलेल्या केजरीवाल यांच्या सुटकेमुळे आपला सत्ताधारी भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांशी चांगली लढत देता येईल अशी आशा पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. केजरीवाल यांची भाषणशैली आणि विरोधकांवर प्रहार करण्याची पद्धत यामुळे ते मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी होतील. विधानसभा निवडणुकीत आपच्या बाजूला पारडे झुकेल असे पक्षाचे नेते म्हणत आहेत.

हेही वाचा >>> राष्ट्रपती, पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा! पश्चिम बंगालमधील आंदोलक डॉक्टरांचे पत्र

केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्यावर काहीच वेळात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी हरियाणा आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी आप भाजपचा पराभव करेल असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या उपस्थितीमुळे आम्हाला बळ मिळेल असे ते म्हणाले. तर आता केजरीवाल हरियाणा विधानसभा निवडणुकीची सूत्रे हाती घेतील अशी आशा खासदार राघव चढ्ढा यांनी बोलून दाखवली. ‘पक्षाने गुजरात आणि दिल्लीमधील निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढवल्या व हरियाणामधील निवडणूकही त्यांच्या नेतृत्वाखाली लढवू. मला आशा आहे की, ते तिहारमधून सुटका झाल्यावर लगेच निवडणुकीची सूत्रे हाती घेतील,’ असे चढ्ढा म्हणाले.

हेही वाचा >>> हिमाचल प्रदेशात मशिदीतील अवैध बांधकामांबाबत निदर्शने ; आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा

केजरीवाल हे पक्षाचा सर्वात मोठा चेहरा आहेत. त्यामुळेच त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते का असा प्रश्न आपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने विचारला. ‘‘आप राष्ट्रीय पक्ष झाल्यानंतर विविध प्रकरणांमध्ये आमच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आले. आमचा पक्ष राष्ट्रीय पातळीवर वाढू नये याच कारणासाठी केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांना तुरुंगात टाकण्यात आले,’’ असा आरोप त्यांनी केला.

आप, भाजपची परस्परांवर टीका

सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना केजरीवाल यांना आरसा दाखवला आहे अशी टीका भाजपने केली. तसेच त्यांनी तातडीने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही पक्षाने केली. पक्षाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केजरीवाल यांचा उल्लेख कट्टर बेईमान असा केला. तर, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने भाजपचा खोटेपणा उघड पडला आहे अशी टीका आपच्या वतीने करण्यात आली.

सीबीआयने संशयातीत असणे आवश्यक; न्यायमूर्ती भुयान यांचे निरीक्षण

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठामधील न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी सीबीआयची चांगलीच कानउघाडणी केली. सीझरच्या पत्नीप्रमाणे ‘सीबीआय’ संशयातीत असली पाहिजे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

सीबीआयने प्रामाणिक आणि पारदर्शी असले पाहिजे. अटकेची कारवाई पक्षपाती नाही याची खात्री लोकांना व्हावी यासाठी सर्व प्रयत्न सीबीआयने करणे अपेक्षित असते. एखाद्या कारवाईबाबत लोकांचा दृष्टिकोन काय आहे हेही महत्त्वाचे ठरते. म्हणूनच सीबीआय म्हणजे ‘पिंजऱ्यातील पोपट’ ही लोकांच्या मनातील धारणा काढून टाकण्यासाठी सीबीआयने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सुनावले.

‘सीबीआय’ म्हणजे पिंजऱ्यातील पोपट असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने ११ वर्षांपूर्वी केली होती. कोळसाकांड प्रकरणात ‘सीबीआय’च्या अहवालामध्ये तत्कालीन केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून ‘सीबीआय’ राजकीय हस्तक्षेपाला बळी पडत असून ‘सीबीआय’ पिंजऱ्यातील पोपट बनला असल्याची टिप्पणी न्या. राजेद्रमल लोढा यांनी केली होती.

तपास यंत्रणांचा गैरवापर!

● केंद्र सरकारने गेल्या १० वर्षांमध्ये आपल्या राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर केला असल्याचा आरोप

● काँग्रेसने केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर केला. तरीही लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपला २४० जागांवर खाली आणून चोख उत्तर दिले अशी टीका पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केली. केजरीवाल यांना जामीन मिळाल्याची बातमी मिळताच दिल्लीमधील पक्षाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आणि समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. जामिनाचे वृत्त मिळाल्यानंतर नेते कार्यालयात जमले आणि एकमेकांना मिठाई वाटली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal release on bail will give boost to aap in upcoming assembly elections print politics news zws