शिवसेना पक्षफुटीनंतर तसेच शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आगामी पालिका निवडणूक तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आता बेरजेच्या राजकारणाला प्राधान्य देत आहेत. असे असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी आप आणि ठाकरे गटात युती होणार का? असे विचारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आप आणि ठाकरे गट यांच्यातील युतीच्या शक्यतेबाबत जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सिसोदियांच्या अटकेवर काँग्रेसची सावध प्रतिक्रिया; अजय माकन यांचा मात्र ‘आप’वर भ्रष्टाचाराचा आरोप, सीबीआयचे केले कौतुक

केजरीवाल यांच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी हेतू असतो

निवडणूक आयोगाने पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांनंतर अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आप पक्ष तसेच ठाकरे गटाकडून ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले जात आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेदेखील उपस्थित होते. या भेटीबाबत ठाकरे गटातील सूत्रांनी अधिक माहिती दिली आहे. “केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीच्या माध्यमातून अशा कठीण काळात आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, असा संदेश अरविंद केजरीवाल यांना द्यायचा होता. तसेच या भेटीतून दिल्लीलाही (मोदी सरकार) केजरीवाल यांना संदेश द्यायचा होता,” असे मत ठाकरे गटातील नेत्याने व्यक्त केले. तसेच या भेटीवर काँग्रेसच्या नेत्यानेही प्रतिक्रिया दिली आहे. “केजरीवाल हे कुशाग्र नेते आहेत. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी उद्देश आणि हेतू असतो,” असे काँग्रेसचा एक महत्त्वाचा नेता म्हणाला आहे.

हेही वाचा >>> karnataka election 2023 : ‘मुस्लीम उमेदवाराला चुकूनही मत देऊ नका,’ भाजपा आमदाराचे विधान; म्हणाले, “टिपू सुलतान…”

जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा काय ते बघू

केजरीवाल आणि ठाकरे यांच्यात जवळचे संबंध नाहीत. मात्र या द्वयीची भेट म्हणजे उद्याच्या युतीसाठीचा एक प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. भाजपा या सामाईक शत्रूला पराभूत करण्यासाठी हे दोन्ही बडे नेते एकत्र येण्याच्या शक्यतेकडे दुर्लक्षही करता येणार नाही. आपने आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचे ठरवलेले आहे. या निवडणुकीत आप सर्व २२८ वॉर्डांमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी याबाबत थेट भाष्य करणे टाळलेले आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते, “सध्या आम्ही दोघांनी फक्त बेरोजगारी तसेच देशाला भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा काय करायचे ते बघू,” अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिलेली आहे.

हेही वाचा >>>

… तर केजरीवाल यांना कोठे स्थान मिळणार?

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता आहे. तसेच दिल्ली महापालिकाही नुकतीच आपच्या हातात आली आहे. मात्र दिल्लीच्या तुलनेत मुंबई महानगरपालिकेचे राजकारण वेगळे आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. येथे वेगवेगळ्या धर्मांचे आणि वेगवेगळ्या प्रदेशांतू आलेले मतदार आहेत. तसेच देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे येथे राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवरील विविध पक्षांचे अस्तित्व जाणवते. मुंबईमध्ये भाजपा, शिवसेना हे दोन प्रमुख पक्ष आहेत. तसेच येथे काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन पक्षांचेही अस्तित्व आहे. येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी अशा छोट्या पक्षांच्या अस्तित्वालाही नाकारता येत नाही.

हेही वाचा >>> मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी विरोधी पक्षनेतेपदावर डोळा; वसुंधरा राजेंचं वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन!

येथे आगामी पालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाची शिवसेना सोबत निवडणूक लढवणार आहे. तर उद्धव ठाकरे यांचा गट, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडी म्हणून मुंबई पालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. दुसरीकडे ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात नुकतीच युती झालेली आहे. त्यामुळे ठाकरे आणि केजरीवाल यांच्यात युती झालीच तर अशा स्थितीत केजरीवाल यांच्या आप पक्षाला कुठे आणि कसे स्थान असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबईत ‘आप’ला जनाधार मिळणार का?

अरविंद केजरीवाल यांनी पक्षाची स्थापना केल्यापासून मुंबईत आपचे अस्तित्व आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आपचे कार्यकर्ते मुंबईत मोर्चा, निदर्शने आयोजित करत असतात. मुंबई आपच्या अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांनी वेळोवेळी मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका केलेली आहे. मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. यंदाचा अर्थसंकल्प ५२ हजार ६१९ कोटी रुपयांचा होता. या अर्थसंकल्पावर मेनन यांनी सडकून टीका केली. प्राधान्यक्रम लक्षात न घेता कंत्राटदारांच्या भल्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे, असा आरोप मेनन यांनी केलेला आहे. तसेच मुंबई पालिकेत भ्रष्टाचार होतो, असा आरोपही मेनन सातत्याने करत असतात. अशा परिस्थितीत ‘आप’ला किती जनाधार लाभणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >>> ‘आमदार, खासदार, मुख्यमंत्री झालो, मोदींचाच आशीर्वाद,’ बी एस येडियुरप्पांचे विधान

मुंबईत ‘आप’ला यश मिळणार?

दरम्यान, देशातील सर्वांत श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेवर मागील दोन दशकांपेक्षा जास्त काळ शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. सध्या येथे प्रशासकीय राजवट असून मुंबई पालिकेचे आयुक्तच पालिकेचा कारभार हाकत आहेत. मुंबई पालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेता ‘आप’ने आपली तयारी सुरू केली आहे. भ्रष्टाचार, रेंगाळलेली विकासकामे या मुद्द्यांना घेऊन ‘आप’ लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या मोहिमेत केजरीवाल, पर्यायाने ‘आप’ला, किती यश मिळणार हे येणारा काळच ठरवेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal uddhav thackeray meeting bmc election alliance know possibility prd