आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंंद केजरीवाल यांनी सत्ता गमावल्यानंतर मंगळवारी (४ मार्च) पंजाबला रवाना झाले. दिल्लीतील सत्ता हातून गेल्यानंतर एका महिन्यानंतर केजरीवाल १० दिवसांसाठी होशियारपूर इथे विपश्यनेसाठी पोहोचले. याआधीही केजरीवाल यांनी तीन वेळा विपश्यना केली आहे. काय आहे याचे कारण जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर अरविंद केजरीवाल आता सार्वजनिक ठिकाणी कमीच दिसले. यामध्येच प्रमुख सत्ता हातून गेल्यानंतर जवळपास एका महिन्याने केजरीवाल विपश्यनेसाठी पंजाबला पोहोचले आहेत. होशियारपूर इथे ते ५ मार्च ते १५ मार्च विपश्यना करणार आहेत, यावेळी ते सहकुटुंब साधनेसाठी गेले आहेत.

दिल्लीत नवीन विधिमंडळाचे पहिले अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी केजरीवाल विपश्यनेसाठी निघाले आहेत. या अधिवेशनात आप सरकारच्या कामगिरीबद्दल नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांकडून (कॅग) अहवाल सादर करण्यात आले. या अहवालात केजरीवाल जामीनावर सुटलेल्या उत्पादन शुल्क धोरण प्रकल्पाचाही समावेश होता. काँग्रेसच्या म्हणण्यांनुसार केजरीवालांचा पंजाब दौरा महत्त्वाचा आहे, कारण ते आता पंजाबच्या राजकारणात मोठी भूमिका बजावतील असा अंदाज आहे. शिवाय अनेक आप आमदार आता पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे हा दौरा ‘आप’साठी महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जातंय. पंजाबमध्ये भगवंत मान यांची जागा केजरीवाल घेतील अशा अफवाही पसरवल्या जात आहेत. मात्र, ‘आप’ने या अफवा फेटाळून लावल्या आहेत.

दुसरीकडे दिल्लीतील काही नेत्यांनी केजरीवाल यांच्यावर विपश्यनेवरून टीका केली आहे. “विपश्यनेपेक्षा केजरीवाल यांना पश्चात्तापाची आणि दिल्लीतील जनतेची माफी मागण्याची गरज आहे. कोणत्या विपश्यनेसाठी नाही तर दिल्लीनंतर आता पंजाबमध्ये पक्षाला सावरण्यासाठी आणि राज्यसभेत पोहोचायला काहीतरी जुगाड करण्यासाठी ते पंजाबला गेले आहेत”, असे दिल्ली भाजपाचे अध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांनी म्हटले आहे. “एकदा का कॅगचा अहवाल आला आणि गुन्हा दाखला झाला की केजरीवाल यांना जेलमध्ये विपश्यनेसाठी वेळच वेळ मिळेल”, असे दिल्लीतील मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी म्हटले.

२०१३ : पहिली विधानसभा निवडणूक
२०१३च्या निवडणुकीदरम्यानही केजरीवाल विपश्यनेसाठी गेले होते. ४ डिसेंबर २०१३ला ‘आप’ने पहिली विधानसभा निवडणूक लढवली. ८ डिसेंबरला मतमोजणी होण्यापूर्वी केजरीवाल विपश्यना करून परतले होते. त्यावेळी आपने ७० पैकी २८ जागा जिंकल्या होत्या आणि केजरीवाल पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले.

केजरीवाल यांचा मुख्यमंत्रि‍पदाचा कार्यकाळ दोनच महिने टिकला. भ्रष्टाचारविरोधी जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यात काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला नाही आणि केजरीवाल यांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये पदाचा राजीनामा दिला; त्यानंतर दिल्ली केंद्रशासित प्रदेशात आली.

२०१४ लोकसभा निवडणूक

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीसुद्धा केजरीवाल हरियाणामध्ये विपश्यनेसाठी गेले होते. यावेळी केजरीवाल यांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींविरूद्ध ही निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये आपने ४३२ जागांपैकी फक्त ४ जागा जिंकल्या.

२०१६ मध्ये उच्च न्यायालयाचा दणका

ऑगस्ट २०१६ मध्ये केजरीवाल यांनी हिमाचल प्रदेशात विपश्यना केली. २०१५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र, दिल्ली उप राज्यपालांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असून एक केंद्रशासित प्रदेशच राहील तसंच दिल्लीला राज्याचा दर्जा प्राप्त होणार नाही, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर केजरीवाल यांचे वारंवार नायब राज्यपालांच्या कार्यालयाशी शा‍ब्दिक युद्ध सुरू राहिले; परिणामी केंद्राशीही त्यांचे वाद सुरू झाले. केजरीवाल यांनी केंद्रावर उप राज्यपालांच्या माध्यमातून दिल्लीच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही केला.

२०१७, २०२१ पोटनिवडणुकीत विजय

सप्टेंबर २०१७ मध्ये दिल्लीतील बवाना पोटनिवडणुकीत पक्षाच्या विजयानंतर ‘आप’चे विद्यमान आमदार वेद प्रकाश यांनी राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतरही केजरीवाल महाराष्ट्रात १० दिवसांच्या विपश्यना दौऱ्यावर आले होते.

सप्टेंबर २०२१ मध्ये पहिली चंदीगड महानगरपालिका निवडणूक लढण्याआधीसुद्धा जयपूरमध्ये त्यांनी विपश्यना दौरा केला होता.

२०२२ दिल्ली महानगरपालिका, गुजरातमध्ये एंट्री

डिसेंबर २०२२ हा काळ चांगला ठरला. भाजपाची सत्ता असलेली दिल्ली महानगरपालिका ‘आप’ने हाती घेतली. पहिल्यांदाच २५० पैकी १३४ जागा त्यांनी जिंकल्या. त्यानंतर गुजरात विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकल्या आणि खातं उघडलं. या विजयप्राप्तीनंतर केजरीवाल यांनी विपश्यनेने वर्षांची सांगता केली.

यावेळी केजरीवाल यांनी विपश्यनेतून मला नेहमीच आध्यात्मिक शक्ती आणि मानसिक शांती मिळाली, याचे अनेक फायदे आहेत असे विधान केले होते.

डिसेंबर २०२३ च्या शेवटी केजरीवाल १० दिवसांच्या विपश्यना दौऱ्याहून परतले होते. त्यानंतर दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. याआधी त्यांना ईडीकडून दोनदा समन्स पाठवण्यात आले होते, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

केजरीवाल हे आता १५ मार्चपर्यंत पंजाबमध्ये असणार आहेत. यावेळी भाजपाने त्यांना लक्ष्य केलं आहे. आपची सत्ता आता केवळ पंजाबमध्येच उरल्यामुळे केजरीवाल यांच्या या दौऱ्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भगवंत मान यांची जागा ते घेऊ शकतात अशी भाकीतंही वर्तवण्यात येत आहेत.

दरम्यान, विपश्यना करणारे केजरीवाल हे एकमेव किंवा पहिले राजकारणी नाहीत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेही साधना करतात.