दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली मद्य धोरणप्रकरणी गेल्या महिनाभरापासून तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचा भेटीचा अर्ज तिहार तुरुंग प्रशासनाने फेटाळला आहे. आम आदमी पक्षाने (आप) यापूर्वी सुनीता केजरीवाल यांना भेटू दिले जात नसल्याचा दावा केला होता. सुनीता केजरीवाल यांना तिहार तुरुंगात अरविंद केजरीवाल यांच्याशी समोरासमोर भेटण्याची परवानगी नसल्याचा दावा करीत, तिहार तुरुंग प्रशासन भाजपाच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंग नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे भेटीची परवानगी नाकारण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीच्या मंत्री आतिशी व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आधीच्या भेटीमुळे कारागृह प्रशासनाने सुनीता केजरीवाल यांना परवानगी नाकारली. नियमांनुसार, एका कैद्याला भेेटण्यासाठी दर आठवड्याला फक्त दोन अभ्यागतांना भेटण्याची परवानगी दिली जाते, असे ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने सांगितले. दुसरीकडे आपने दावा केला की, केंद्राच्या दबावामुळे तुरुंग प्रशासनाने सुनीता यांची केजरीवाल यांना भेटण्याची विनंती नाकारली.

हेही वाचा : भाजपा नेत्यांनाही नकोयत ३७० खासदार!

आतिशी आणि भगवंत मान यांना परवानगी

तिहार तुरुंगातील सूत्रांनी सांगितले की, दिल्लीच्या मंत्री आतिशी यांना भेटीची परवानगी देण्यात आली आहे. त्यांनी २९ एप्रिल रोजी केजरीवाल यांना भेटण्यासाठी गेल्या आठवड्यात अर्ज केला होता. “पत्नी सुनीता यांनी केजरीवाल यांची अनेकदा भेट घेतली आहे आणि त्यांना परवानगी नाकारण्याचा प्रश्नच उदभवत नाही. आम्हाला प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. आतिशी यांचा अर्ज आधीच स्वीकारण्यात आला होता,” असे तिहार तुरुंगातील सूत्रांनी सांगितले. मात्र, आपच्या सूत्रांनी तिहार तुरुंग प्रशासनाचा दावा फेटाळून लावला. तिहार प्रशासनाचे म्हणणे आहे की, दोन पूर्वनिश्चित भेटीनंतर सुनीता केजरीवाल यांना परवानगी दिली जाईल.

पक्षाने मात्र यावर आक्षेप घेतला आहे. “सोमवारी (२९ एप्रिल) मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सुनीता केजरीवाल आणि आतिशी यांची नावे २७ एप्रिल रोजी तिहार प्रशासनाकडे पाठविण्यात आली होती. तुरुंग प्रशासनाने आम्हाला आताच कळवले की, ते सोमवारी सुनीता केजरीवाल यांना मुख्यमंत्र्यांना भेटू देणार नाहीत. ते फक्त आतिशी यांना परवानगी देतील,” असे पक्षाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले.

भाजपावर आरोप

‘एक्स’वर एका पोस्टमध्ये पक्षाने आरोप केला आहे, “मोदी सरकारच्या सांगण्यावरून तिहार तुरुंग प्रशासनाने सुनीता केजरीवाल यांची पती अरविंद केजरीवाल यांच्याबरोबरची भेट रद्द केली. मोदी सरकार अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडत आहे. मुख्यमंत्र्यांना दहशतवाद्यासारखे वागवले जात आहे. सुनीता केजरीवाल यांना त्यांचे पती अरविंद केजरीवाल यांना का भेटू देत नाही, हे मोदी सरकारने देशातील जनतेला सांगावे?” असे ते म्हणाले. आतिशी आज केजरीवाल यांची भेट घेणार आहेत; तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मंगळवारी भेटणार आहेत. केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अबकारी धोरणाशी संबंधित मनी लॉडरिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. ते ७ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.

जेल मॅन्युअलनुसार, एक कैदी आठवड्यातून दोनदाच त्याच्या परिचितांना भेटू शकतो आणि दोघे एका वेळीही भेटू शकतात, असे तिहार तुरुंगातील अन्य सूत्रांनी सांगितले. “आतिशींसाठी टोकन क्रमांक आणि भेटीच्या इतर सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. सुनीता नंतर भेटू शकतात”, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. सोमवारी आणि मंगळवारी केजरीवाल यांची भेट घेणारे आतिशी आणि भगवंत मान यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था आणि प्रोटोकॉल इतरांपेक्षा वेगळे असल्याचेही सूत्राने सांगितले आहे.

हेही वाचा : ऐन निवडणुकीत दिल्ली काँग्रेसमध्ये गोंधळ, कोणत्या कारणाने अरविंदर सिंह लवली यांनी राजीनामा दिला?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी सुनीता केजरीवाल यांनी दिल्लीत पहिली सभा घेतली. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, आपच्या पूर्व दिल्लीतील उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीतील सातपैकी चार मतदारसंघांत पक्ष निवडणूक लढवत आहे. इतर तीन जागा युतीतील मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसला देण्यात आल्या आहेत. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत पत्नी सुनीता दिल्ली, पंजाब, हरियाणा व गुजरातमध्ये पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करतील, अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal wife sunita not allowed to meet rac
Show comments