Aryan Mishra Murder Case VHP RSS Reacts : हरियाणाच्या फरिदाबादमध्ये कथित गोरक्षकांनी गायींच्या तस्करीच्या संशयावरून १२ वी इयत्तेत शिकत असलेला विद्यार्थी आर्यन मिश्रा याची हत्या केली. २३ ऑगस्ट रोजी रात्री दिल्ली-आग्रा महामार्गावर गोरक्षकांनी आर्यन मिश्राच्या गाडीचा ३० किलोमीटरपर्यंत पाठलाग करून आर्यनवर गोळ्या झाडत त्याची हत्या केली. या घटनेनंतर गोरक्षक आणि त्यांच्या उच्छादाबद्दल पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी गोरक्षकांच्या या टोळीपासून स्वतःला दूर ठेवलं आहे, तसेच या प्रकरणातून हात झटकले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिदू परिषदेने या गोरक्षाकांवर नाराजी व्यक्त केली आहे. विहिंपचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की “संघ परिवार या असल्या हिंसचाराचं समर्थन करत नाही”. दरम्यान, गोरक्षणासाठी आघाडीवर असलेल्या संघ परिवाराशी संबंधित इतर नेत्यांनी हिंदू तरुणाच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या घटनेचा गोरक्षणाशी काडीमात्र संबंध नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे.

आलोक कुमार म्हणाले, विहिंप कोणत्याही व्यक्तीविरोधात झालेल्या कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचं अथवा कायद्याच्या उल्लंघनाचं समर्थन करत नाही किंवा अशा घटनांना मान्यता देत नाही. गायींच्या संरक्षणासाठी संघ परिवाराने विहिंप किंवा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून कसं काम करता येईल याबाबतचं प्रशिक्षण दिलं आहे. आमचे प्रशिक्षित कार्यकर्ते पोलिसांच्या सहाय्याने व कायद्याच्या चौकटीत काम करतात. आम्हाला विश्वास आहे की हरियाणा पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील आणि याच्या तळापर्यंत पोहोचतील.

हे ही वाचा >> Haryana Election 2024 : “आता मी काय करू?” भाजपाने तिकीट कापल्यावर आमदाराने फोडला टाहो; म्हणाले, “पक्षाने माझ्याबरोबर…”

आर्यन मिश्राच्या हत्येचा गोरक्षणाशी संबंध नाही : विहिंप

पाठोपाठ विहिंपची प्रवक्ते विनोद बन्सल यांनी देखील इंडियन एक्सप्रेसशी बातचीत केली. ते म्हणाले, “हरियाणातील घटनेचा गोरक्षणाशी संबंध नाही असं आम्हाला वाटतं. गोरक्षणासारखा गोष्टीचा एखाद्या भीषण गुन्ह्याशी संबंध जोडणं राजकारण करणाऱ्यांना चांगलं वाटत असलं तरी समाज म्हणून ते कोणीही कधीच स्वीकारणार नाही. घडलेली घटना खूप दुर्दैवी आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. हरियाणात मजबूत सरकार आहे. हे सरकार व पोलीस या प्रकरणाच्या तळाशी पोहोचतील असा आम्हाला विश्वास आहे”.

हे ही वाचा >> Ujjain Rape Case : इथे माणुसकी थिजली! महिलेवर बलात्कार होत होता अन् लोक तिला वाचवण्याऐवजी व्हिडीओ चित्रित करत बसले

गोरक्षणाची मोहीम बदनाम : संघ

दिल्ली-आग्रा मार्गावर स्वयंघोषित गोरक्षकांनी केलेल्या हत्येनंतर हरियाणा पोलिसांनी या टोळीचा म्होरक्या अनिल कौशिक याच्यासह इतर पाच जणंना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की अनिल कौशिक व त्याच्या साथीदारांनी कबूल केलं आहे की त्यांनी आर्यनला गोमांस तस्करी करणारा समजून त्याची हत्या केली. संघ परिवारातील सूत्रांनी कबूल केलं आहे की “हरियाणातील एक तरुणाचा कथित गोरक्षकांच्या हिंसाचारात बळी गेला आहे. भाजपाचे विरोधक आगामी विधानसभा निवडणुकीत या घटनेचं भांडवल करू शकतात. या घटनेमुळे गोरक्षणाची संपूर्ण मोहीम बदनाम झाली आहे”.

हे ही वाचा >> Madhabi Puri Buch : ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ? ‘हिंडनबर्ग’च्या आरोपांची लोकलेखा समितीकडून चौकशीची शक्यता

गोरक्षणाच्या नावाखाली निरपराध लोकांच्या हत्या; आपचा आरोप

दरम्यान, आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी हा हत्याकांडाप्रकरणी हरियाणातील भाजपा सरकारला दोषी ठरवलं आहे. सिंह म्हणाले, “कथित गोरक्षणाच्या नावाखाली माणसं मारली जातायत, मानवतेचा गळा दाबला जातोय. गोरक्षणाच्या नावाखाली दहशतवाद पसरवला जातोय. काही लोक स्वतःला धर्माचे ठेकेदार मानतायत. त्यांना लोकांची हत्या करण्याची कंत्राटं दिली आहेत का? अशा घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चकार शब्द काढत नाहीत. भाजपा देखील या घटनेवर चिडीचूप आहे. या घटनेचा आगामी निवडणुकीवर नक्कीच परिणाम होईल. या सर्व घटना भाजपा सरकारच्या संरक्षणात घडत आहेत”.

हे ही वाचा >> पंतप्रधानांनी देशवासीयांचीच माफी मागावी; शिवपुतळा, जीएसटी, नोटाबंदीचा उल्लेख करत राहुल गांधी यांचे टीकास्त्र

भाजपा सरकरच्या काळात गोरक्षकांसाठी रान मोकळं : ओवैसी

एआयएमआयएमचे प्रमुख व हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीदेखील या घटनेचं वृत्त पाहून संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “आर्यन मिश्राचे मारेकरी गोरक्षक नव्हते, ते राक्षस होते. हरियाणा सरकारने त्यांना सुट दिलीय, रान मोकळं करून दिलं आहे, त्यामुळेच या असल्या घटना घडत आहेत. आमच्या हातून एका ब्राह्मण मुलाची हत्या झाली, आमच्या हातून चूक झाली असं ते मारेकरी सांगतायत. एका कवीने म्हटलंय, तुम्ही मोठी आग लावता, तेव्हा त्यात चुमचंही घर जळून जातं. हरियाणा पोलिसांनी त्यांचं काम या कथित गोरक्षकांवर सोपवलंय का? असा प्रश्न मला पडला आहे”.