Who is Delhi CM: दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर भाजपाकडून आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरविल्यानंतर गुरूवारी शपथविधी सोहळा पार पडेल. सरकार स्थापन झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचारात दिलेली आश्वासने, जाहिरनाम्यात दिलेली वचने पूर्ण करणे, हेच भाजपाच्या नव्या सरकारसमोरील आव्हान असणार आहे. यानिमित्ताने भाजपाने दिलेली प्रमुख आश्वासने कोणती? याची माहिती घेऊ.
प्रमुख आश्वासने
सत्ता आल्यास ८ मार्च रोजी पात्र महिलांना प्रति महिना २,५०० रुपये दिले जाणार, हे भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेले सर्वात मोठे आश्वासन होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारात सांगितले की, आमच्या बहिणींना महिन्याला अडीच हजार रुपये देण्याचे वचन मी देत आहे. ही मोदी गॅरंटी आहे, त्यामुळे ती पूर्ण होणारच. दिल्लीत भाजपाचे सरकार स्थापन होताच ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पात्र महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरूवात होईल.
हे आश्वासन प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपाला पुढील काही महिने तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पात्र महिलांची नोंदणी करण्यासाठी आणि अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यासाठी प्रशासनाचा कस लागेल. तसेच लगेचच राज्याचा अर्थसंकल्प मांडावा लागणार असल्यामुळे त्याचेही काम सुरू करावे लागणार आहे. गर्भवती महिलांना २१ हजार रुपयांची मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, याचाही विचार अर्थसंकल्पात करावा लागणार आहे.
आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी करणे, हेदेखील भाजपासमोरील मोठे आव्हान असणार आहे. आम आदमी पक्षाच्या सरकारने ही योजना स्वीकारली नव्हती. तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारनंतर केंद्राच्या आरोग्य विमा योजनेला नकार देणारे दिल्ली दुसरे राज्य होते. आता या योजनेची अंमलबजावणी केल्यामुळे दिल्लीला आरोग्य सेवा आणखी विकसित करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळण्याचे मार्ग मोकळे होतील.
यमुनेची स्वच्छता
सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वात आधी यमुना नदीची स्वच्छता करण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. २०१५ साली सत्ता स्थापन झाल्यानंतर आम आदमी पक्षाने दोन वर्षात यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. दोन वर्षांनी तुम्ही यमुनेत आंघोळ करू शकता, असे आम आदमी पक्षाने सांगितले होते.
यंदाच्या निवडणुकीपूर्वी यमुना नदीची स्वच्छता हा प्रचाराचील कळीचा मुद्दा झाला होता. याआधी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने हे आश्वासन पाळले नाही, असे भाजपाने सांगितले.