Dilip Ghosh Marriage: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे सुरू असलेला हिंसाचार आणि इतर राजकीय वादामुळे भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष यांच्यातून विस्तवही जात नाही. पश्चिम बंगालमधील राजकीय पक्षांचा संघर्षपूर्ण असा इतिहास आणि वर्तमान आहे. यापूर्वी डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेस असा संघर्ष उडाला होता. आता तृणमूल विरुद्ध काँग्रेस आणि भाजपा असा संघर्ष दिसतो. मात्र, आता एका कारणामुळे सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि भाजपाच्या पदाधिकारी रिंकू मजूमदार विवाहबंधनात अडकले आहेत. यानिमित्त मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

घोष आणि मजूमदार यांनी शुक्रवारी (१८ एप्रिल) पारंपरिक पद्धत आणि नोंदणी पद्धतीने लग्न केले. या सोहळ्याला त्यांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. दिलीप घोष यांचे हे पहिलेच लग्न असून मजूमदार यांचे हे दुसरे लग्न आहे. ५० वर्षांच्या मजूमदार यांना पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे.

शुक्रवारी सकाळपासून घोष यांना भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून शुभेच्छा येण्यास सुरुवात झाली. ममता बॅनर्जी यांनी शुभेच्छा संदेशाबरोबर फुले आणि मिठाई पाठवली. तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनीही शुभेच्छा दिल्या; तर मदन मित्रा म्हणाले की, दिलीप घोष यांचे लग्न होत आहे याचा आनंद वाटतो. आता माझी विनंती असेल की, दिलीप दादांनी वहिनींबरोबर (मजूमदार) प्रवास करावा.

घोष आणि मजूमदार यांचे लग्न कसे जुळले?

घोष आणि मजूमदार हे २०२१ साली पहिल्यांदा भेटले होते. सकाळी एकत्र फेरफटका मारणे आणि इतर कारणांमुळे ते जवळ येत गेले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मजूमदार यांनी पुढाकार घेऊन घोष यांना लग्नाचा प्रस्ताव दिला. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात मजूमदार यांनी घोष यांना लग्नाचा प्रस्ताव दिला. यावर उत्तर देण्यासाठी घोष यांनी दोन महिन्यांचा वेळ घेतला.

शुक्रवारी लग्नाच्या दिवशी मजूमदार यांनीच पुढाकार घेत, घोष यांच्या घरी वरात घेऊन गेल्या. सायंकाळी ६ वाजता न्यू टाऊन येथील घोष यांच्या घरी मजूमदार वाजत गाजत पोहोचल्या. त्यांनी लाल आणि गुलाबी रंगाची बनारसी साडी नेसली होती. “घोष यांच्याशी लग्न करताना अतिशय आनंद वाटतोय, आज संपूर्ण माध्यमांच्या नजरा आमच्याकडे लागल्या आहेत”, अशी प्रतिक्रिया मजूमदार यांनी दिली.

दरम्यान, लग्नाबद्दल प्रतिक्रिया देताना दिलीप घोष म्हणाले, “लग्न करून मी माझ्या आईची इच्छा पूर्ण करत आहे. मी नेहमी म्हणायचो की, पक्ष माझ्यासाठी कुटुंब आहे. माझे स्वतःचे कुटुंब बनविण्याचा मी कधीही विचार केला नव्हता. पण, माझ्या आईच्या इच्छेला मी टाळू शकलो नाही. त्यानंतर मजूमदार यांनी प्रस्ताव दिला आणि मी तो स्वीकारला. माझ्या आयुष्यात आता दोन महिला आहेत. एक माझी आई आणि आता पत्नी.” घोष पुढे म्हणाले की, लग्नानंतर एखाद दिवस सुट्टी घेऊन ते पुन्हा पक्षाच्या कामाला लागणार आहेत.

भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घोष यांनी लहानपणीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यानिमित्त पश्चिम बंगालच्या विविध जिल्ह्यांचा प्रवास करत असताना त्यांनी लग्नाचा विचार कधीही केला नव्हता. २०१५ साली त्यांनी भाजपाचे काम करण्यास सुरुवात केली आणि लवकरच त्यांची वर्णी प्रदेशाध्यक्ष पदावर लागली.

२०१६ साली भाजपाने पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत केवळ तीनच जागा जिंकल्या होत्या, ज्यात दिलीप घोष हेही आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या नेतृत्वामुळे २०१९ साली पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ४२ जागांपैकी १८ जागा भाजपाने जिंकल्या. घोष स्वतः खरगपूर लोकसभेत जिंकले. त्यानंतर त्यांना भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष या पदी बढती देण्यात आली.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत घोष यांना बुर्दवान-दुर्गापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे माजी नेते किर्ती आझाद यांच्याकडून पराभव सहन करावा लागला.

मजूमदार यांच्या कुटुंबाचा पाठिंबा

मजूमदार यांचा मुलगा आयटी कंपनीत काम करत असून तो वेगळा राहतो. त्याचा या लग्नाला विरोध नाही, अशी माहिती मिळत आहे.

तृणमूल काँग्रेसचे नेते मित्रा यांनी ६० व्या वर्षात लग्न केल्याच्या घोष यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. ते म्हणाले, “जे लोक लवकर लग्न करतात त्यांना त्याचे महत्त्व तितकेसे समजत नाही. पण, जे लोक उशिरा लग्न करतात त्यांना त्याचे महत्त्व कळलेले असते, त्यामुळे ते आणखी जबाबदारीने वागतात.”