तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ऊर्फ केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रात पक्ष वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी महाराष्ट्रात संघटनेचा पाया बळकट करण्यासाठी बीआरएसचे प्रयत्न सुरू आहेत. बीआरएसने मराठवाडा आणि विदर्भात काही महिन्यांपूर्वी सभा घेतल्या, ज्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती. आता मुख्यमंत्री केसीआर आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह २६ जून रोजी सोलापूर जिल्ह्यात येत आहेत. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी दि. २७ जून रोजी मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांचे मंत्रिमंडळ पंढरपूरमधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचे दर्शन घेईल.
बीआरएसचे महाराष्ट्र किसान सेलचे प्रमुख माणिक कदम म्हणाले, “केसीआर यांनी याआधीही पंढरपूर मंदिराला भेट दिलेली आहे. या वेळी त्यांच्यासोबत तेलंगणाचे संपूर्ण मंत्रिमंडळ येत आहे.” केसीआर आणि मंत्रिमंडळ पंढरपूर येथे उपस्थित असताना हेलिकॉप्टरमधून वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. यासोबतच बीआरएसमध्ये विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. शेतकऱ्यांमध्ये बीआरएसची लोकप्रियता वाढविण्याचाही प्रयत्न केला जात आहे. बीआरएसच्या या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील राजकीय पक्ष त्यातही विरोधात असलेल्या राजकीय पक्षामध्ये काही प्रमाणात अस्वस्थता पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “आम्ही बीआरएसला कमी लेखत नाहीत. बीआरएसने महाराष्ट्रात सक्रियता वाढविली आहे. महाराष्ट्रात पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी बीआरएसने आक्रमक पवित्रा अवलंबला आहे.” केसीआर यांनी महाराष्ट्रात पाय रोवत असताना ‘किसान सरकार’ असा शब्दप्रयोग वापरला आहे. शेतकऱ्यांप्रति कटिबद्ध असलेले सरकार स्थापन करायचे आहे, अशी भूमिका ते वारंवार मांडत असतात.
काही दिवसांपूर्वी केसीआर यांनी नागपूरमध्ये बीआरएसचे कार्यालय थाटले. त्या ठिकाणी त्यांनी जाहीर सभाही घेतली. या वेळी बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये गुलाबी रंगाचे फलक लावून संपूर्ण शहर बीआरएसमय करून टाकले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयदेखील नागपूर शहरातच आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यक्षेत्र नागपूर आहे. बीआरएसच्या वाटचालीबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “पंढरपूरमध्ये येऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही स्वागत करतो. पंढरपूरचे दरवाजे सर्व जातिधर्म, समुदाय, राजकीय पक्ष आणि कोणत्याही राज्यासाठी खुले आहेत. जर केसीआर आणि त्यांचे मंत्रिमंडळ पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येत असतील तर त्या सर्वांचे आम्ही स्वागतच करू.”
“मात्र दर्शनाला येत असताना या ठिकाणी कोणतेही राजकारण करू नये, अशी आमची अपेक्षा आहे. इथे येणाऱ्यांनी भाविक म्हणूनच यावे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूरनंतर बीआरएस औरंगाबाद, पुणे आणि मुंबईत कार्यालय थाटणार आहे. केसीआर यांच्या पंढरपूर भेटीचे स्वागत करत असतानाच महाराष्ट्रातील राजकीय पुढारी त्यांच्या हेतूबाबत शंका घेत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “बीआरएसने महाराष्ट्रात सभा घेतल्या. मात्र त्यांनी त्यांची विचारधारा स्पष्ट केलेली नाही. जर ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात आहेत, तर मग ते विरोधकांसह एकत्र का येत नाहीत. हा प्रश्न आमच्या मनात निर्माण झालेला आहे.” फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात बीआरएसने नांदेड जिल्ह्यात दोन सभा घेतल्या. नांदेड जिल्हा हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, “केसीआर एका भक्कम योजनेसह महाराष्ट्रात येत आहेत, हे आता निश्चित दिसत आहे. बीआरएस भाजपाला अप्रत्यक्ष मदत करत आहे का? त्यांना महाविकास आघाडीची मते कमी करायची आहेत का? जर हे सत्य असेल तर त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही.” बीआरएसने जाहीर केले आहे की, ते आगामी निवडणुकांमध्ये ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघात त्यांचे उमेदवार उभे करणार आहेत. तसेच निवडणुकीत राज्यातील कोणत्याही पक्षासोबत आघाडी केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा >> “राहुल गांधी विरोधकांचा चेहरा नकोत,” केसीआर यांचा काँग्रेसशी आघाडीला होकार, पण राहुल गांधींना नकार
महाराष्ट्रात आपला विस्तार करत असताना बीआरएसकडून तेलंगणा सरकारच्या योजनांची जाहिरात करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज आणि २४ तास पाणी देऊ, अशा काही लोकप्रिय घोषणा त्यांनी केल्या आहेत. शेतीचा शाश्वत विकास साधण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला प्रति एकरी १० हजारांची मदत देण्यात येईल, अशी योजना केसीआर सरकारने केलेली आहे. अशा उपाययोजनेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल, असा बीआरएस पक्षाचा दावा आहे.
नागपूर येथे घेतलेल्या जाहीर सभेत केसीआर म्हणाले, “महाराष्ट्रात सर्व संसाधने असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात अपयश का आले? महाराष्ट्रात कृष्णा, गोदावरी, प्राणहिता, मुळा, वैनगंगा आणि इतर नद्या वाहतात. तरीही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोळसा आहे, तरीही इथला शेतकरी विजेपासून वंचित आहे. शेतकऱ्यांना रात्री शेतात काम करावे लागते.” तेलंगणाच्या विकास मॉडेलचे उदाहरण देताना केसीआर पुढे म्हणाले, “आम्ही शेतकऱ्यांच्या जीवनात चांगला बदल घडवला. तेलंगणाने शेतीत अग्रेसर असलेल्या पंजाब राज्याला मागे टाकले आहे. देशातील भात लागवडीचे क्षेत्र ९४ लाख एकर असून त्यापैकी ५४ लाख एकरचे क्षेत्र एकट्या तेलंगणामध्ये आहे.”
बीआरएसच्या महाराष्ट्रातील शिरकावाबाबत बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपा-शिवसेना युतीवर बीआरएसचा कोणताही प्रभाव पडणार नाही. आमचा पाया भक्कम आहे. तसेच भाजपामधून कुणीही बीआरएसमध्ये प्रवेश करणार नाही, असेही ते म्हणाले.