विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या तेलंगणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जनतेला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांतील नेते येथे धडाडीने प्रचार करत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादमध्ये एका रोड शोदरम्यान मोठे विधान केले. आम्ही सत्तेत आल्यास हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करू, असे आदित्यनाथ म्हणाले. या आश्वासनानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. एआयएमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनीदेखील योगी आदित्यनाथ यांच्या या आश्वासनावर प्रतिक्रिया दिली आहे. भाग्यनगर हे नाव नेमके कोठून आले, हे अगोदर त्यांना विचारा, असे ओवैसी म्हणाले आहेत.
भाजपाकडून द्वेषाचे राजकारण केले जात आहे- ओवैसी
“सर्वांत अगोदर भाग्यनगर हे नाव कोठून आले, हे त्यांना विचारायला हवे. या नावाचा उल्लेख नेमका कोठे आहे. ते हैदराबाद नावाचा तिरस्कार करतात. म्हणूनच ते बदलण्याचे आश्वासन दिले जात आहे. हैदराबाद हे नाव आमची ओळख आहे. आमच्या ओळखीला तुम्ही दुसरे नाव कसे देणार. ते फक्त द्वेषाचे राजकारण करत आहेत,” असे ओवैसी म्हणाले.
“जनता भाजपाला योग्य ते उत्तर देईल”
हैदराबादचे नाव बदलण्याचे आश्वासन हे भाजपाच्या विभाजनवादी राजकारणाचे प्रतिक आहे, असे म्हणत हैदराबाद आणि तेलंगणातील जनता भाजपाला योग्य ते उत्तर देईल, अशी आशाही ओवैसी यांनी व्यक्त केली.
योगी आदित्यनाथ नेमकं काय म्हणाले?
योगी आदित्यनाथ रविवारी (२६ नोव्हेंबर) तेलंगणाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक सभांना संबोधित केले. यावेळी बोलताना आम्ही सत्तेत आल्यास हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर असे करू, असे आश्वासन हैदराबादच्या जनतेला दिले. तसेच सत्तेत आल्यास आम्ही मुस्लिमांना दिले जाणारे आरक्षण रद्द करून ते अनुसूचित जाती, जमाती तसेच इतर मागासवर्गीयांमध्ये विभागून देऊ, असेही आदित्यनाथ म्हणाले. मुस्लिमांना देण्यात आलेले आरक्षण असंवैधानिक आहे, असा दावादेखील योगी आदित्यनाथ यांनी केला.
“आम्ही सत्तेत आल्यास तुम्हाला कोणतेही बंधन येणार नाही”
“काँग्रेसने या शहराला हैदराबाद असे नाव दिले. बीआरएस सरकार तुम्हाला १७ सप्टेंबरचा दिवस साजरा करू देत नाही. भाजपा सत्तेत आल्यावर मात्र तुम्हाला कोणतेही बंधन येणार नाही. आम्ही हैदराबादचे भाग्यनगर करायला येथे आलो आहोत,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले. ते हैदराबाद शहरातील गोशामहल या भागात एका रोड शोदरम्यान बोलत होते.
हैदर कोण होता, नाव बदलण्यात अडचण काय – रेड्डी
योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या आश्वासनानंतर केंद्रीय मंत्री तथा तेलंगणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांनीदेखील भाग्यनगर या नावाचे समर्थन केले. “नक्कीच. आम्ही सत्तेत आल्यास हैदराबाद शहराचे नाव बदलू. हैदर नेमका कोण होता? आपल्याला हैदर या नावाची खरंच गरज आहे का? हैदर हे नाव कोठून आलेले आहे? भाजपा सत्तेत आल्यास आम्ही नक्कीच या शहराचे नाव बदलून भाग्यनगर करू,” असे रेड्डी म्हणाले. बॉम्बे शहराचे नाव मुंबई करण्यात आले, कलकत्ता शहराचे नाव कोलकाता करण्यात आले. राजपथचे नाव कर्तव्यपथ असे करण्यात आले. मग हैदराबादचे नाव भाग्यनगर करण्यास काय हरकत आहे, असा प्रश्नही रेड्डी यांनी केला.