या वर्षी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा, काँग्रेस यासारख्या प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान एमआयएम पक्षानेही येथील निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तसे संकेत एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी दिले आहेत. ते रविवारी (१ जुलै) जयपूर येथे जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी भाजपा तसेच काँग्रेसवर सडकून टीका केली.
एमआयएम राजस्थानमध्ये उमेदवार उभे करणार
मागील काही महिन्यांपासून ओवैसी राजस्थानचा सातत्याने दौरा करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष बळकट करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. आपल्या दौऱ्यादरम्यान ते कार्यकर्त्यांसोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत आहेत. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन तेथील प्रश्न समजून घेत आहेत. रविवार आयोजित केलेल्या सभेत ओवैसी यांनी जयपूरमधील हवा महल या मतदारसंघातून राजस्थान एमआयएमच्या कोअर कमिटीतील नेते जमील खान यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले. सध्या हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. मंत्री महेश जोशी हे या मतदारसंघात आमदार आहेत. ते अशोक गेहलोत यांच्या जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात.
“अल्पसंख्याक समाजाचे ९ आमदार काहीही बोलणार नाहीत”
“राजस्थानमधील अल्पसंख्याकांना कोणतेही नेतृत्व नाही. तुम्ही म्हणाल की आमच्याकडे ७ मुस्लीम आमदार आहेत. मात्र हे नवरत्न तुमचे नेते नाहीत. ते तुमच्यासाठी कधीही बोलणार नाहीत. अशोक गेहलोत यांनी त्यांच्या तोंडाला कुलूप लावलेले आहे. काही दिवसांपूर्वी जुनैद आणि नासीर या दोघांचे अपहरण करण्यात आले. त्यांना हरियाणामध्ये नेऊन जिवंत जाळण्यात आले. काँग्रेसमधील ९ मुस्लीम समाजाचे आमदार यावर काहीही बोलणार नाहीत. त्यांच्यात जुनैद आणि नासीर यांच्या हत्यांवर बोलण्याची हिंमत नाही,” अशी घणाघाती टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली.
“मला अशोक गेहलोत यांची दहशतवाद्याची व्याख्या समजत नाही”
काही दिवसांपूर्वी कन्हैयालाल या टेलरचा खून करण्यात आला होता. ओवैसी यांनी जुनैद आणि नासीर यांच्या खुनाची तुलना कन्हैयालाल यांच्या खुनाशी केली. “आम्ही कन्हैयालाल यांच्या हत्येचा निषेध करतो. कन्हैयालाल यांची हत्या दहशतवाद्यांनी केली होती, हे मी मान्य करतो. मात्र जुनैद आणि नासीर यांची हत्या करणाऱ्यांना आपण काय म्हणणार आहोत? त्यांना तुम्ही देशभक्त म्हणणार का? कन्हैयालाल यांची हत्या दहशतवाद्यांनीच केली होती. कन्हैयालाल यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची आर्थिक मदत करण्यात आली. मात्र जुनैद आणि नासीर यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना फक्त १५ लाख रुपये देण्यात आले. या भेदभावाबद्दल विचारणा केल्यावर कन्हैयालाल यांची हत्या दहशतवाद्यांनी केली होती, असे स्पष्टीकरण गेहलोत देतात. मला अशोक गेहलोत यांची दहशतवाद्याची व्याख्या समजत नाही,” असे ओवैसी म्हणाले. ओवैसी यांनी पश्मांदा मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच काँग्रेस मुस्लिमांच्या प्रश्नांविषयी बोलत नाही. कारण ते मुस्लिमांना फक्त फसवतात, असेही ओवैसी म्हणाले.
काँग्रेसची असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका
दरम्यान, ओवैसी यांच्या टीकेवर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. एमआयएम हा पक्ष भाजपाची बी-टी आहे, असा आरोप काँग्रेसने केला. “ओवैसी फक्त निवडणूक जवळ आल्यावरच राजस्थानमध्ये येतात. ते भाजपाची बी-टीम म्हणून काम करतात, हे प्रत्येकालाच माहिती आहे. मागील पाच वर्षांत राजस्थान सरकारने मुस्लिमांसाठी खूप काही केलेले आहे. अन्य कोणत्याही राज्यांत ऐवढे काम झालेले नाही. अशोक गेहलोत यांनी नासीर आणि जुनैद यांच्या गावात जाऊन, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. नासीर आणि जुनैद यांची हत्या करणारे लोक हे हरियाणा या भाजपाशासित राज्यातील आहेत. मात्र ओवैसी यांनी हरियाणामध्ये हा मुद्दा उपस्थित केल्याचे मला आठवत नाही. राजस्थानमध्ये अन्य कोणत्याही पक्षाला स्थान नाही,” असे प्रत्युत्तर अल्पसंख्याक विकासमंत्री शाले मोहम्मद यांनी दिले.
मुस्लीम समाजाकडून काँग्रेसचा विरोध
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून राजस्थानमधील मुस्लीम मतदारांनी वेगवेगळ्या प्रसंगी गेहलोत सरकारचा विरोध केलेला आहे. काँग्रेस पक्षाने महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अल्पसंख्याक उमेदवार न दिल्यामुळे मुस्लिमांनी आंदोनल केले होते. काँग्रेसमधील मुस्लीम नेते स्वत:ला प्रतिस्पर्धी तयार होऊन नये म्हणून कोणालाही संधी देण्यास तयार नाहीत, असा आरोप तेव्हा करण्यात आला होता. तसेच उर्दू भाषेतून शिक्षण देण्याच्या मोहिमेकडे गेहलोत सरकार दुर्लक्ष करत आहे. तसेच मदरशांमधील शिक्षकांच्या समस्यांकडेही गेहलोत दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप मुस्लीम समाजाकडून केला जातो.