दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकूमाच्या विरोधासाठी विरोधी पक्षांचा पाठिंबा मागत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेटही घेतली. मात्र ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीन पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केजरीवाल यांना पाठिंबा देण्यास नकार दिला. आपचे प्रमुख केजरीवाल कठोर हिंदुत्वाची भूमिका घेऊन चालतात, असा आरोप त्यांनी केला आहे.
ओवैसी म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांनी कलम ३७० बाबत भाजपाला पाठिंबा का दिला? आता ते का रडत आहेत? मी अरविंद केजरीवाल यांना अजिबात पाठिंबा देणार नाही. कारण ते सौम्य हिंदुत्ववादी नसून कठोर हिंदुत्ववादी आहेत.” ५ ऑगस्ट २०१९ रोजी जेव्हा कलम ३७० हटविण्यात आले, तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी भाजपाचे गुणगाण गात केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला होता. त्यांनी त्यावेळी ट्विट करत म्हटले, “जम्मू आणि काश्मीरबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देतो. या निर्णयामुळे राज्यात शांतता आणि विकास होण्यास मदत होईल, अशी आशा करूयात.”
हे वाचा >> “मोदी सरकारमध्ये हिंमत असेल, तर…”, असदुद्दीन ओवेसींचं खुलं आव्हान; म्हणाले, “२ हजार किलोमीटर…!”
आतापर्यंत अरविंद केजरीवाल यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, के. चंद्रशेखर राव, तेजस्वी यादव आणि ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन पाठिंबा मागितला आहे. तसेच सीपीआय (एम)चे राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी यांचीही त्यांनी भेट घेतली. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही ते भेट घेणार आहेत. दरम्यान, ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरदेखील टीका केली. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच धर्माच्या लोकांना आमंत्रित केले होते. “२८ मे रोजी मोदी यांनी केवळ एकाच धर्माच्या लोकांना इमारतीच्या उद्घाटनासाठी प्रवेश दिला. त्यांनी सर्वधर्मीय लोकांना उद्घाटनासाठी आमंत्रित करायला हवे होते. ते फक्त हिंदूचे पंतप्रधान नसून भारताच्या १३० कोटी जनतेचे पंतप्रधान आहेत,” अशी टीका ओवैसी यांनी केली.
२८ मे रोजी झालेल्या उद्घाटन सोहळ्यासाठी अधेनाम मठातील मठाधीशांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सेंगोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविला. हा सेंगोल नव्या इमारतीमधील लोकसभेच्या दालनात ठेवण्यात येणार आहे. तामिळनाडूमधील विविध अधेनाम मठातील पुजारी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. ओवैसी म्हणाले की, जर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या इमारतीचे उद्घाटन केले असते तर मी या सोहळ्याला उपस्थित राहिलो असतो. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः उद्घाटन करू नये, असा मुद्दा उपस्थित करून २० विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता.