संतोष प्रधान
एखाद्या पक्षात एखादा नेता नेतृत्वाच्या जवळ जाऊ शकतो किंवा अगदी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो, यात फारसे वावगे नाही. प्रसिद्धीचे वलय किंवा जनाधार नसतानाही
एक नव्हे तर तब्बल तीन राजकीय पक्षांमध्ये प्रवेश केल्यावर त्या राजकीय पक्षांमध्ये नेतृत्वाच्या जवळ जाणे हे तर कसबच. ही किमया साधली आहे भाजपच्या आशीष कुळकर्णी यांनी. राज्यातील नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचे समन्वयक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आशीष कुळकर्णी यांचा झाला आहे. जेथे गेले तेथे नेतृत्वाच्या जवळ जाण्याचे कौशल्य त्यांनी साधले आहे. तीन राजकीय पक्षांमध्ये नेतृत्वाचा विश्वास संपादन करणे हे जरा कठीणच. पण हे सारे कुळकर्णी यांनी साध्य केले. अगदी अलीकडेच आशीष कुळकर्णी यांचे नाव चर्चेत आले ते देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्यातील भेटीमुळे. कुळकर्णी यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त अशोकराव, फडणवीस हे समोरासमोर आले आणि मग चर्चा सुरू झाली ती चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची. अशोक चव्हाण यांना पक्षांतर करणार नाही असा खुलासा करावा लागला तर काँग्रेसने अशोकरावांच्या भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली.
शिवसेनेत असताना मातोश्री, काँग्रेसमध्ये असताना राहुल व प्रियंका गांधी तर भाजपमध्ये फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये आशीष कुळकर्णी यांचा समावेश होता. यातूनच कुळकर्णी यांचे महत्त्व अधोरेखित होते. नेतृत्वाच्या जवळ जाण्याचे कसब असलेले आशीष कुळकर्णी कधीही प्रसिद्धीच्या झोतात नसतात किंवा नेतेमंडळींच्या पुढेपुढे करीत नाहीत. पडद्यामागे राहून त्यांचे काम सुरू असते.
शिवसेनेत असताना मातोश्रीचे निकटवर्तीय मानले जात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातील म्हणून गणले जात असत. मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे पत्र घेऊन आशीष कुळकर्णी हे वर्षा बंगल्यावर गेले होते. तेव्हा मनोहर जोशी नुकतेच दौऱ्यावरून परतले होते. कुळकर्णी यांनी राजीनामा देण्याचे बाळासाहेबांचे पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले होते. शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली तसे आशीष कुळकर्णी यांचे मातोश्रीशी संबंध दुरावले.
शिवसेना सोडून कुळकर्णी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या अगोदर शिवसेनेतून नारायण राणेही काँग्रेसमध्ये दाखल झाले होतेच. राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकीत मतांचे गणित जुळवणे किंवा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारसंघांचा अंदाज घेऊन त्यानुसार आखणी करण्यात कुळकर्णी हे माहीर मानले जातात. 2009च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवडणूक नियोजनात कुळकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली होती. तेव्हा नुकतीच मतदारसंघांची पुनर्रचना झाली होती. आघाडीत काँग्रेसला कोणते मतदारसंघ अनुकूल ठरू शकतात, निवडणूक प्रचाराच्या काळात काँग्रेसला कुठे जोर लावावा लागेल याचे सारे नियोजन आशीष कुळकर्णी यांनी केले होते. पुढे ते काँग्रेसच्या दिल्लीतील वाॅररूममध्ये पोहचले. राहुल गांधी, प्रियंका गांधी व अहमद पटेल यांच्या जवळ गेले. काँग्रेसच्या दिल्लीतील वाॉररूममध्ये निवडणूक नियोजनाचे काम ते पाहात असत. 2014च्या दारुण पराभवानंतर प्रियंका गांधी यांनी वाॅररूममध्ये लक्ष घातले होते. त्यांच्याशी त्यांचा दैनंदिन संपर्क असायचा. काँग्रेसमधील चौकडी किंवा पक्ष वाढीकडे दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधणारे पत्र आशीष कुळकर्णी यांनी राहुल गांधी यांना पाठवून पक्षाचा राजीनामा दिला होता. तेव्हा त्यांचे पत्र गाजले होते.
मुंबईत आशीष कुळकर्णी हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ गेले. 2019च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या निवडणूक नियोजनात भाग घेतला होता. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रणनीतित त्यांचा सहभाग होता. पुढे त्यांनी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आणि त्यांची प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत पुरेशी मते नसतानाही भाजपने दोन्ही निवडणुकांमध्ये प्रत्येकी एक जागा अधिकची जिंकली. शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाची साथ लाभल्याने मतांचे गणित जुळले. पण मतांचे नियोजन कसे करायचे याचे सारे गणित आशीष कुळकर्णी यांनी आखून दिले होते. राज्यसभा निवडणुकीत दोन उमेदवारांना प्रत्येकी 48 मते द्यायची तर तिसऱ्याला दोघांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून आणण्याची सारी आकडेमोड कुळकर्णी यांनीच केली होती.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सारे आमदार गुवाहटीला ठाण मांडून बसले होते. तेव्हा शिंदे गटाला कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने मदत करण्याकरिता आशीष कुळकर्णी यांना भाजपच्या वतीने खास गुवाहटीला पाठविण्यात आले होते.
नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपमध्ये समन्वय ठेवण्यासाठी समन्वयक पदाची जबाबदारी कुळकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यावरून शिवसेना, काँग्रेस वा भाजप असो, पडद्यामागे राहून महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यात आशिष कुळकर्णी हे पार पडत असतात,हे पुन्हा अधोरेखित झाले