नांदेड : भोकर विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्येविरुद्ध काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण, या बहुचर्चित प्रश्नाचे उत्तर गुरुवारी रात्री काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतच मिळाले. या महत्त्वाच्या मतदारसंघात श्रीजया विरुद्ध तिरुपती कदम अशी लढत होईल. तिरुपती यांना ‘पप्पू’ टोपणनावाने संबांधले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस उमेदवाराचे नाव तिरुपती कदम कोंढेकर असे असले, तरी त्याने स्वतःनेच ‘पप्पू’ हे टोपण नाव प्रचलित केले आहे. काँग्रेसकडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम यांच्यासह भोकर तालुक्यातील सुभाष किन्हाळकर, जि.प.चे माजी सभापती बाळासाहेब रावणगावकर प्रभृतींनी उमेदवारी मागितली होती. भाजपाचे राज्यातले पहिले नगराध्यक्ष रामराव चौधरी हेही आघाडीच्या उमेदवारीसाठी पुढे आले होते, पण या अनुभवी उमेदवारांचा विचार झाला नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा – “मी, हर्षवर्धन पाटील व फडणवीस सागर बंगल्यावर…”, अजित पवारांनी सांगितला ‘तो’ प्रसंग; ‘अदृश्य प्रचारा’वरून टोला!

पक्षाच्या केंद्रीय निवड मंडळाकडे तिरुपती कोंढेकर यांच्याशिवाय बालाजी गाढे या अन्य एका नवख्या कार्यकर्त्याचे नाव गेले होते. तिरुपती का, बालाजी याचा फैसला दिल्लीतील नेत्यांना करायचा होता, त्यात तिरुपतीची लॉटरी लागली आहे. भोकर मतदारसंघात मागील काळात शंकरराव चव्हाण वि. बाबासाहेब गोरठेकर, अशोक चव्हाण वि. माधव किन्हाळकर आणि नंतर चव्हाण वि. बापूसाहेब गोरठेकर अशा दिग्गज नेत्यांदरम्यान लढती झाल्या; पण आजवर पंचायत समिती किंवा जि.प.ची निवडणूक कधी न लढलेल्या दोन नवख्या उमेदवारांत लढत होणार, हे स्पष्ट झाले.

दोन प्रमुख पक्षांचे उमेदवार नवखे असले, तरी श्रीजया यांच्या मागे शंकररावांची पुण्याई आणि अशोक व अमिता चव्हाण यांचे राजकीय वलय आहे. बलाढ्य यंत्रणा हे त्यांचे बलस्थान मानले जात असताना तिरुपती कोंढेकर यांच्या नशिबी यांतील काहीच नाही. त्यांच्या उमेदवारीस पक्षातील इच्छुकांसह प्रमुख नेत्यांचा विरोध असल्याचे समोर आले आहे. पण चव्हाण समर्थक आणि भाजपासाठी कोंढेकरांची उमेदवारी खूपच सोयीची झाली असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा – Big Fights in Maharashtra Election 2019 : २०१९ मधल्या बिग फाईट्स कुठल्या होत्या? कुणी उधळला विजयाचा गुलाल? कोण ठरलं जाएंट किलर?

तिरुपती कोंढेकर हे नांदेडजवळच्या कोंढा (ता.अर्धापूर) येथील रहिवासी असून काँग्रेसचे नेतृत्व करत असताना अशोक चव्हाण यांनी त्यांना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केले होते. त्यांच्या वडिलांना चव्हाणांमुळे बाजार समितीत सभापतीपद मिळाले; पण चव्हाणांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर कोंढेकर पिता-पुत्र काँग्रेस पक्षात राहिले. मराठा आरक्षण आंदोलनात तिरुपती कोंढेकर यांनी पदाचा राजीनामा देऊन छाप पाडली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत कोंढेकर यांच्या गावात काँग्रेस पक्षाला नव्हे, तर भाजपा उमेदवाराला आघाडी मिळाली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan daughter challenges tirupati kadam in bhokar print politics news ssb