Ashok Chavan Bhokar Assembly Constituency : भोकर आणि शंकरराव चव्हाणांचे कुटुंब हे समीकरण गेली साठ वर्षे काँग्रेसला या मतदारसंघातून विजय मिळवून देत होते. यंदा चव्हाण घराणेच भाजपबरोबर असल्याने उमेदवार निवडीचा प्रश्न आता काँग्रेससमोर आहे. अशोक चव्हाण यांची कन्या अॅड्. श्रीजया चव्हाण यांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याने चव्हाणांची तिसरी पिढी विधानसभेत दिसेल, असे चित्र सध्या दिसत आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष तसेच या पक्षाची आमदारकी सोडल्यानंतर आपल्या परिवाराचा भोकर मतदारसंघ राखण्यासाठी त्यांनी या मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपतील जुन्या किंवा नव्या कार्यकर्त्यांतून एखाद्यास संधी देण्याऐवजी चव्हाण यांनी आपल्या कन्येलाच आखाड्यात उतरविण्याचे निश्चित केले असून गेल्या आठवड्यात भाजप नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भोकरचा दौरा केल्यानंतर श्रीजया यांच्या उमेदवारीसंदर्भात त्यांनी चव्हाण व त्यांच्या समर्थकांना आश्वस्त केल्यामुळे भोकरमधील भाजपचा उमेदवार निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
भोकर मतदारसंघावर १९६२ पासून काँग्रेस पक्षाचा प्रभाव राहिला आहे. भाजप किंवा अन्य पक्षाला या मतदारसंघात कधीही संधी मिळाली नाही. पण अशोक चव्हाण व त्यांचा मोठा गट भाजपवासी झाल्यामुळे या मतदारसंघात आपले खाते उघडण्याची संधी या पक्षाला प्रथमच मिळाली आहे. दुसऱ्या बाजूला चव्हाण यांच्या कन्येविरुद्ध निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस पक्षाकडे अनेकांनी तयारी दर्शविली असली, तरी लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसचा एकही नेता भोकरमध्ये फिरकला नाही किंवा या मतदारसंघात अशोक चव्हाण व भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चाही केलेली नाही.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी या मतदारसंघात सुमारे १ लाखांच्या मताधिक्याने विजय प्राप्त केला होता. ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजप उमेदवारास घसघशीत मताधिक्य अपेक्षित होते. पण मतमोजणीनंतर भाजपला मोठा धक्का बसला. पक्षाच्या उमेदवाराचे मताधिक्य हजाराचा आकडाही पार करू शकले नाही. या धक्क्यातून सावरत चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. गेल्या आठवड्यात सुमारे ९०० कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या कामांचा शुभारंभ त्यांनी केला. इतर कार्यक्रम-उपक्रमांद्वारे जनसंपर्क वाढविण्यात येत आहे. पण दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षात मात्र सामसूम दिसत आहे.
काँग्रेसकडून वेगळ्या रणनीतीची अपेक्षा
मधल्या काळात काँग्रेस पक्षाने वेगवेगळ्या मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागविले. भोकर मतदारसंघात पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम तसेच भोकरचे सुभाष पाटील किन्हाळकर यांच्यासह १४ कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली असली, तरी चव्हाण आणि भाजपच्या मजबूत यंत्रणेला भेदण्यासाठी काँग्रेस पक्षाने अद्याप कोणतेही पाऊल टाकलेले नाही. प्रा.संदीपकुमार देशमुख या कार्यकर्त्याने ‘भोकरचा आमदार भूमिपुत्रच हवा’ असा नारा देत श्रीजया चव्हाण यांच्या संभाव्य उमेदवारीला आव्हान दिल्याचे दिसून आले. भोकरमध्ये चव्हाण यांच्या विरोधात कोणाला उभे करायचे, याचा निर्णय काँग्रेस नेत्यांनी लवकर घ्यावा तसेच या मतदारसंघासाठी वेगळी रणनीती आखावी, अशी विनंती पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात इत्यादी नेत्यांकडे करण्यात आली आहे.
© The Indian Express (P) Ltd