काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च अशा कार्यकारी समितीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश झाल्याने पक्षातील त्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. याशिवाय मुंबईचे माजी महापौर चंद्रकांत हंडोरे यांची मध्य प्रदेशच्या निरीक्षकपदानंतर कार्यकारी समितीवर कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याने विधान परिषद निवडणुकीतील पराभवामुळे त्यांच्यावर झालेला अन्याय दूर केला आहे.
पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकारी समितीवरील सदस्य, विशेष व कायमस्वरुपी निमंत्रितांची यादी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मुकूल वासनिक, अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, रजनी पाटील यांना संधी मिळाली आहे. यापैकी वासनिक आणि पांडे हे दोघेही वर्षानुवर्षे पक्षाचे सरचिटणीस वा राज्याचे प्रभारीपदी आहेत. अशोक चव्हाण यांचा राज्यातून नव्याने समावेश झाला आहे. पक्षाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वा विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचा कार्यकारी समितीत समावेश केलेला नाही. यापूर्वी बाळासाहेब थोरात हे राज्यातून कार्यकारी समितीचे सदस्य होते.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबद्दल मध्यंतरी वेगवेगळ्या वावड्या उठत होत्या. त्यातच गेल्या वर्षी विधानसभेत शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अशोक चव्हाण यांच्यासह पक्षाचे काही आमदार वेळेत पोहोचू शकले नव्हते. यामुळे संशय बळावला होता. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या वावड्यांचा इन्कार केला होता. खरगे यांनी अशोकरावांची कार्यकारी समिती या पक्षाच्या सर्वोच्च अशा निर्णय प्रक्रियेतील समितीवर नियुक्ती करून त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. अशोक चव्हाण यांच्या शिफारसीवरूनच अलीकडेच विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती झाली होती. यातून अशोक चव्हाण यांचे पक्षातील महत्त्व वाढल्याचा संदेश गेला आहे.
कार्यकारी समितीवर माजी मंत्री व मुंबईचे माजी महापौर चंद्रकांत हंडोरे यांची कायमस्वरुपी निमंत्रित म्हणून वर्णी लागली आहे. गेल्या वर्षी विधान परिषद निवडणुकीत हंडोरे यांचा पराभव झाला होता. पक्षाचे दुसरे उमेदवार भाई जगताप निवडून आले पण हंडोरे या दलित समाजातील नेत्याचा पराभव पक्षाने गांभीर्याने घेतला होता. हंडोरे यांची अलीकडेच मध्य प्रदेश निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यापाठोपाठ कार्यकारी समितीवर कायमस्वरुपी निमंत्रित म्हणून नियुक्ती करून पक्षाने त्यांनाही विशेष महत्त्व दिले आहे.
हेही वाचा – दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा कागदावरच, प्रशासनाचा आक्षेप
माणिकराव ठाकरे व रजनी पाटील या दोघांची राज्याचे प्रभारी या नात्याने निवड झाली आहे. यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे या अन्य दोन महिला नेत्यांनाही पक्षाने राष्ट्रीय दर्जा दिला आहे.