नांदेड : काँग्रेस विचारधारेतील कणखर नेते, दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त येत्या शनिवार-रविवारी आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांतून भाजपाचे नाव आणि या पक्षाच्या नेत्यांची छायाचित्रे वगळण्याची समयसूचक ‘दक्ष’ता या पक्षाचे नेते खासदार अशोक चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ सत्तेत राहिलेले चव्हाण कुटुंब सहा महिन्यांपूर्वी अचानक भाजपावासी झाले. त्यानंतर या पक्षाने अशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकी बहाल करून लोकसभा निवडणुकीपूर्वी नांदेड मतदारसंघ सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. पण चव्हाणांचा हा राजकीय निर्णय शंकररावांना मानणाऱ्या जिल्ह्यातील विशेषत: भोकर मतदारसंघातील काँग्रेसी मतदारांना रूचला नाही. परिणामी निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपा उमेदवाराचा दारुण पराभव झाला.

हेही वाचा >>> विधान परिषद सभापतीपदाचा महायुतीत तिढा; तिन्ही पक्षांचा पदावर दावा

अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या शिक्षण संस्थेच्या पुढाकारातून शंकररावांच्या पुण्यतिथीनिमित्त काही पारंपरिक कार्यक्रम पार पडले. आता शंकररावांची नात आणि अशोकरावांची कन्या श्रीजया चव्हाण भाजपातर्फे विधानसभा निवडणुकीची तयारी करत असली, तरी चव्हाण परिवार तसेच या परिवाराशी संबंधित शंकरराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून भोकर विधानसभा मतदारसंघात शंकररावांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिरांसह अन्य कार्यक्रम होत आहेत. पण या कार्यक्रमांपासून पक्ष तसेच भाजपा नेत्यांची छायाचित्रे दूर ठेवण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. प्रसिद्धीच्या छापील साहित्यावर चव्हाण दाम्पत्य व श्रीजया यांचीच छायाचित्रे आहेत.

भोकर-अर्धापूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीत भाजपा पदाधिकाऱ्यांसह चव्हाण यांच्या समर्थकांचा पुढाकार दिसून येत आहे. शंकररावांची संपूर्ण हयात काँग्रेस पक्षात गेली. त्यांच्या सर्वसमावेशक-धर्मनिरपेक्ष विचारांस मानणाऱ्या मतदारांना शंकररावांच्या छायाचित्रासोबत भाजपातील सध्याच्या नेत्यांची नावे व छायाचित्रे वाचणे-पाहणे आवडणार नाही, हे विचारात घेऊन वरील कार्यक्रमापासून भाजपाला दूर ठेवण्यात आले असावे, असे मानले जाते. नांदेड शहरात १४ जुलै रोजी मॅरेथॉन स्पर्धाही होणार असून त्यातूनही भाजपाला वगळण्यात आले आहे. या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती, काँग्रेसचे माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

काँग्रेसतर्फे महारक्तदान शिबिर

अशोक चव्हाण काँग्रेस पक्षात असताना पक्षाच्या शहर व जिल्हा समितीतर्फे शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्याची प्रथा रुढ झाली होती. आता चव्हाण व त्यांच्या परिवाराने पक्ष बदलला असला, तरी येत्या १४ जुलै रोजी जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या परिसरात महारक्तदान शिबिर घेण्याची तयारी युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. पक्षातर्फे कार्यालयाबाहेर मोठा फलकही लावण्यात आला आहे.

चिखलीकर यांना डावलले

खासदार चव्हाण यांच्या परिवाराशी संबंधित कंपनीच्या स्थानिक वृत्तपत्रातर्फे १४ जुलै रोजी एक स्वतंत्र कार्यक्रम होत आहे. या कार्यकमासाठी भाजपाचे जिल्ह्यातील तीन आमदारांसह ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर, खासदार अजित गोपछडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे, पण पक्षाचे माजी खासदार व लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना डावलण्यात आलेल्या बाबीची नोंद चिखलीकर समर्थकांनी घेतली आहे. निवडणूक निकालानंतर चिखलीकर यांनी चव्हाण यांचा भाजपा प्रवेश आपल्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर चव्हाण यांनी त्यांच्याशी संपर्क-संवाद सोडला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan keep bjp away from program on birth anniversary of shankarao chavan print politics news zws
Show comments