छत्रपती संभाजीनगर : एक दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल या अपेक्षित निर्णयाबरोबरच नांदेड जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछेडे यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे नांदेड जिल्ह्यातील दोघांना खासदारकी मिळणार आहे. या अनपेक्षित निर्णयाबरोबरच बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे समर्थकांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. डॉ. गोपछेडे वैद्यकीय संघ परिवारातील वैद्यकीय आघाडीचे काम करतात. लिंगायत समाजाच्या मतांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, असा संदेश त्यांच्या उमेदवारीनंतर राजकीय पटलावर चर्चेत आहे.
भाजपात अशोक चव्हाण यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होतीच. तो निर्णय आज जाहीर झाला. अशोकराव चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनाही १९८८ साली राज्यसभेची उमेदवारी मिळाली होती. आता अशोक चव्हाण यांनाही राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे नांदेडमधून दोन राज्यसभा सदस्य असू शकतील, अशी व्यूहरचना दिसून येत आहे. डॉ. अजित गोपछेडे यांचे नाव यापूर्वी विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी चर्चेत आले होते. मात्र, ऐनवेळी त्यांच्या उमेदवारीवर फुली मारण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रात परिवाराचे संघटन करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. नांदेड, लातूर, सोलापूर, धाराशिव या लोकसभा मतदारसंघांमध्ये लिंगायत समाजाची मते निर्णायक ठरू शकतात. लातूरमध्ये तर ‘मामुलि’ या शब्दांवरून राजकारणाचे चक्रच फिरले होते. मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत ही मते काँग्रेसला नकोत, असा प्रचार तेव्हा शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी केला होता आणि विलासराव देशमुख यांचा पराभव झाला होता. त्यामुळे लिंगायत मतांचा प्रभाव लक्षात घेता डॉ. गोपछेडे यांची निवड झाली असावी, असा कयास बांधला जात आहे.
हेही वाचा – मेधा कुलकर्णींना उमेदवारी; पुण्यात लोकसभेपूर्वीची तयारी
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना जाहीर झालेल्या उमेदवारीमुळे त्यांची नवी राजकीय कारकीर्द कशी असेल याची उत्सुकता मराठवाड्यात आहे. वडील शंकरराव चव्हाण यांची राजकीय हयात ज्या काँग्रेस पक्षात झाली, त्या पक्षाच्या विचारसरणीत लहानपणापासून वाढलेल्या अशोक चव्हाण यांच्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात वयाच्या ६७व्या वर्षी भाजपाबरोबर झाली आहे.
हेही वाचा – नितीश कुमार भाजपाबरोबर नव्या कपड्यांत; ‘धर्मनिरपेक्षते’च्या भूमिकेत बदल होणार का?
विधान परिषदेच्या व राज्यसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आणण्यात आले होते. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या नावापुढे पुन्हा एकदा फुली पडल्याचे स्पष्ट झाले आहे. अलिकडेच त्यांनी ‘आता मला मतदारसंघ राहिला नाही’, असे विधान गावपातळीवरील एका सार्वजनिक कार्यक्रमात केले होते. वारंवार पक्ष आपल्या उमेदवारीचा विचार करत नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती.