सुहास सरदेशमुख
औरंगाबाद : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटली, सरकारच्या अविश्वास ठरावाच्या वेळी वाहतुकीमुळे मतदान प्रक्रियेपर्यंत पोहोचू न शकल्याच्या योगायोगामुळे संभ्रमाच्या वाढत्या गुंत्यात अशोकराव चव्हाण यांच्यासारखा मोठा नेता अडकल्याचे चित्र अजूनही कायम आहे. विशेष म्हणजे हा गुंता सुटावा म्हणून फारसे प्रयत्न होताना दिसत नसल्याने वाढलेला संभ्रम कालावधी जाणीवपूर्वक आहे का, असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही चर्चेत आहे. दरम्यान ही चर्चा दोन महिन्यापासून का होते आहे, हेच मला समजत नाही. कोण करते ही चर्चा, त्यावर एकदा स्पष्टीकरणही दिले आहे. तरीही ही चर्चा होतेच कशी असा प्रश्न मलाही पडला आहे.
हेही वाचा… संभाजी ब्रिगेडच्या ‘वैचारिक कृतीशीलते’मुळे शिवसेनेसमोर नवे प्रश्न उभे राहण्याची शक्यता
मात्र, अशोकराव चव्हाण यांच्याबाबत होणाऱ्या चर्चा वावड्या असल्याचे सांगत आमदार अमरनाथ राजूरकर म्हणाले, ‘चर्चा चुकीच्या आहेत. येत्या काळात राहुल गांधीसुद्धा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पक्षाचे सर्व कार्यक्रम नीट सुरू आहेत. त्यामुळे असे काही नाही.’
गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार या चर्चा सुरू होत्या. त्यावर ‘ मी असा काही निर्णय घेतला नाही,’ असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केल्यानंतरही मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरूच आहेत. भाजपचे खासदार प्रताप पाटील चखलीकर यांनीही या संभ्रमात भरच टाकली. ते म्हणाले, ‘विधान परिषद निवडणुकीच्या वेळी तसेच विधिमंडळात बहुमत मांडताना चार सदस्यांसह ते गैरहजर राहिले. त्यामुळे भाजपला मदत झाली. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे आवश्यकच आहे. पक्ष नेतृत्वाने त्यांना भाजपात घेण्याचे ठरविले तर त्यांचे स्वागत केले जाईल असे मी म्हणालो होतो. आजही त्या मतांशी मी कायम आहे. त्यांनीही त्यांच्या सहकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केल्याची माहिती आहे. पण त्यांना भाजपामध्ये प्रवेश द्यायचा की नाही हा निर्णय पक्ष नेतृत्वाचा असणार आहे.’
हेही वाचा… मनसेच्या मराठी अस्मितेला हिंदुत्वाची जोड मतदार स्वीकारतील?
विरोधकांकडून अशोकराव चव्हाण पक्ष सोडण्यास तयार आहेत असे वातावरण निर्माण केले जात असताना संभ्रम कालावधी मात्र वाढताना दिसून येत आहे. काँग्रेसच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी पक्षांतराची चर्चा फेटाळून लावली. या अनुषंगाने अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘ही चर्चा दोन महिन्यापासून का आणि कशी होते हेच मला समजत नाही. खरे तर ही केवळ माध्यमांमध्येच चर्चा आहे. तसे काहीही नाही. ’