नांदेड : राज्यातील अनेक सत्ताधारी नेत्यांच्या चल-अचल मालमत्तेसह सुवर्णसंपन्नेतही वाढ झाल्याचे समोर आलेले असताना निवडणुकीच्या राजकारणातून स्वेच्छेने निवृत्ती पत्करलेल्या भोकरच्या माजी आमदार अमिता अशोक चव्हाण यांच्याकडे असलेल्या मौल्यवान हिऱ्याच्या बाजारमूल्याने ७७ लाखांवरून ९३ लाख रुपयांवर झेप घेतली आहे. ही वाढ केवळ नऊ महिन्यांतील आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नांदेड लोकसभा आणि जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या अनेक तारांकित उमेदवारांचे मालमत्ताविषयक तपशील देणारे शपथपत्र खुले झाले आहे. भोकर मतदारसंघात खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या अ‍ॅड. श्रीजया चव्हाण या भाजपाच्या उमेदवार असून त्यांच्यासोबत अमिता चव्हाण यांनीही निवडणूक अर्ज दाखल केल्यामुळे त्यांचेही शपथपत्र समोर आले. त्यांच्याकडील लकाकणाऱ्या हिऱ्याच्या मूल्यात झालेली वृद्धी अर्थशास्त्राचे अभ्यासक संदीपकुमार देशमुख यांनी समोर आणली.

हेही वाचा – Prakash Ambedkar Health Condition : वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची प्रकृती बिघडली, छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल!

गेल्या फेब्रुवारी महिन्यात अशोक चव्हाण यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला होता. त्यासोबतच्या शपथपत्रात त्यांनी आपली तसेच परिवारातील अन्य सदस्यांची मालमत्ता जाहीर केली होती. त्यावेळी अमिता चव्हाण यांच्याकडे असलेल्या १४० कॅरेट्सच्या हिऱ्याचे मूल्य ७७ लाख ५२ हजार होते. त्यानंतरच्या ९ महिन्यांत याच हिऱ्याचे मूल्य ९३ लाखांवर गेले आहे.

शेतकऱ्यासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंवर भरमसाठ जीएसटी आकारणाऱ्या सरकारने हिऱ्याच्या घडणावळीवर मात्र केवळ दीड टक्का जीएसटी आकारलेला आहे. या वास्तवाकडे लक्ष वेधून जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्याची लूट अन् हिरे खरेदी करणाऱ्या श्रीमंतांना मात्र घसघशीत सूट अशी टिप्पणी संदीपकुमार देशमुख यांनी केली.

हेही वाचा – Nawab Malik : नवाब मलिकांचा भाजपा नेत्यांना इशारा; म्हणाले, “दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांविरोधात…”

कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी भाजपातर्फे भोकरमधून निवडणूक लढविणाऱ्या श्रीजया चव्हाण यांनी शपथपत्रात शेती व व्यापार हा आपला व्यवसाय नमूद केला आहे. त्यांच्याकडे ४ कोटींची चल व सुमारे १६ कोटींची अचल संपत्ती आहे. त्यांच्यावर कोणत्याही वित्तीय संस्थेचे कर्ज नाही. पण आयकर विभागाने चुकीने आकारलेली १३ लाख रुपयांची थकीत रक्कम त्यांनी शपथपत्रात नमूद केली आहे. त्याबाबतचा त्यांचा आक्षेप संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे.

श्रीजया यांच्या नावे मुंबई तसेच नांदेडमध्ये वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती आहेत. वेगवेगळ्या बँकांत त्यांची गुंतवणूकही आहे. अनेक नामांकित कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या नावावर आहेत. त्यात अदानी पावरच्या शेअरचाही समावेश आहे. मतदारसंघांतल्या भाऊराव चव्हाण कारखान्याच्या त्या सभासद आहेत, पण भोकर किंवा कारखाना कार्यक्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये श्रीजया यांचे खाते नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan wife diamond worth lakhs print politics news ssb