संजीव कुळकर्णी
नांदेड : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेची माहिती माध्यमांना देण्यासाठी मुंबईतील पत्रकार परिषदेस गैरहजर राहिलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आता या यात्रेच्या महाराष्ट्रातील आगमनाच्या पूर्वतयारीमध्ये आपल्या समर्थकांनिशी उतरले आहेत. बुधवारी येथे झालेल्या प्राथमिक बैठकीतील त्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. तसेच आपण काँग्रेस पक्षासोबतच असल्याचा संदेशही त्यांनी दिला.
खा. गांधी यांची यात्रा बुधवारी कन्याकुमारी येथून सुरू झाली. नोव्हेंबरचा पहिला आठवडा सरल्यानंतर ही यात्रा महाराष्ट्रात देगलूरमध्ये दाखल होणार असल्याचे प्रदेश काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, तसेच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्यासह येथे व्यापक बैठक घेतली. या वेळी पक्षाचे आजी-माजी आमदार, पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने हजर होते.
हेही वाचा… भाजप प्रवेशाबाबत डॉ. विश्वजित कदम यांचा नकार; पण निराळ्या घटनाक्रमांमुळे चर्चेला जोर
राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात प्रथम नांदेड जिल्ह्यात येणार असून सुमारे सव्वाशे कि.मी. अंतर पार करत ती येथून हिंगोलीला जाणार आहे. यात्रेदरम्यान काँग्रेसच्या युवराजांचे जिल्ह्यात चार मुक्काम होतील. देगलूर-शंकरनगर-नायगाव-नांदेड असा या यात्रेचा मार्ग निश्चित झाला आहे. यात्रा नांदेडहून अर्धापूरला जाण्यापूर्वी नांदेडमध्ये मोठी जाहीर सभा होणार आहे.
हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!
या यात्रेचा प्रवास, मुक्काम व इतर कार्यक्रम याबाबत प्रदेश काँग्रेसमधील कृतिशील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. माणिकराव ठाकरे हे प्रबोधन व प्रशिक्षण समितीचे राज्याचे अध्यक्ष आहेत. ही यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात दाखल होत असताना देगलूरजवळ खासदार गांधी व इतरांचे प्रदेश काँग्रेसतर्फे स्वागत होईल. जिल्ह्यातील संपूर्ण नियोजनाची जबाबदारी अशोक चव्हाण व त्यांच्या चमूवर टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान खा. गांधी नांदेडमध्ये प्रचार सभेसाठी आले होते. त्यानंतर सुमारे साडेतीन वर्षांनी ते नांदेडमध्ये येत असताना पक्षाचे महाराष्ट्रातील नेते अशोक चव्हाण यांच्या बाबतीत संभ्रम आणि संशयाचे वातावरण तयार झाले असले, तरी आपण पक्षासोबतच आहोत, असा संदेश त्यांनी बुधवारच्या बैठकीच्या निमित्ताने दिला; पण ही बैठक आटोपल्यावर ते सायंकाळी औरंगाबादला रवाना झाले. तेथून ते मुंबईला जाणार आहेत.
घरगुती अडचणींमुळे अनुपस्थित
माजी मंत्री अशोक चव्हाण दोन दिवस नांदेड मुक्कामी होते. या दौऱ्यात त्यांनी पक्षाच्या बैठकीसाठी मुद्दाम वेळ काढला. माणिकराव ठाकरे यांना हिंगोलीहून येण्यास सुमारे दीड तास उशीर झाला तरी चव्हाण व इतर आजी-माजी आमदार विश्रामगृहावर त्यांची प्रतीक्षा करत थांबले होते. या दरम्यान काही पत्रकारांनी त्यांची भेट घेतली असता, मुंबईतील पत्रकार परिषदेस घरगुती अडचणींमुळे आपल्याला जाता आले नाही. तसे मी प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांना कळवले होते, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. भारत जोडो यात्रेच्या आयोजनातील पदाधिकारी जी जबाबदारी सोपवतील, ती आम्ही पार पाडू, असे ते म्हणाले.