काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला राजस्थानमध्ये प्रवेश करणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामधील वाद पुन्हा पेटला आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी पायलट यांना ‘गद्दार’ म्हटलं होतं. या विधानानंतर गेहलोत आणि पायलट यांच्या गटात तणाव वाढला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अशोक गेहलोत गुजरातमध्ये दाखल झाले होते. तेव्हा एका खासगी वृत्तवाहिनीला बोलताना गेहलोत यांनी सचिन पायलट यांना लक्ष्य केलं. “गद्दार कधीच मुख्यमंत्री नाही बनू शकत. हायकमांड सुद्धा सचिन पायलट यांना मुख्यमंत्री नाही करू शकत. कारण, सचिन पायलट यांच्या पाठीमागे दहा आमदार नसून, त्यांनी बंडखोरी केली, पक्षाला धोका दिला, ते एक गद्दार आहे,” अशा शब्दांत गेहलोत यांनी पायलट यांच्यावर टीका केली होती.
हेही वाचा : “२०१७ च्या अगोदर सर्वात गलिच्छ शहरांमध्ये गणले जाणारे आग्रा शहर आता …”; योगी आदित्यनाथ यांचं विधान!
“देशात पहिल्यांदा असे झाले की, पक्षाच्या अध्यक्षाने आपले सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. यासाठी भाजपाने पैसे पुरवले, ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे काही वरिष्ठ नेत्यांचा सहभाग होता,” असा आरोपही गेहलोत यांनी पायलट यांच्यावर केला होता.
गेहलोत आणि पायलट यांच्या वादावर आता राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे. “अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे दोघेही पक्षासाठी बहुमूल्य संपत्ती आहेत. या प्रकणावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. राजस्थानातील राजकीय स्थितीचा ‘भारत जोडो’ यात्रेवर काही परिणाम होणार नाही. ‘भारत जोडो’ यात्रा राजस्थानात गेल्यावर तिचे भव्य स्वागत होईल, याची मला खात्री आहे,” असं राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा : ‘काँग्रेसच्या ‘फोडा आणि राज्य करा’ नीतीचा गुजरातला फटका,’ नरेंद्र मोदींचे टीकास्र
तर, गेहलोत आणि पायलट प्रकरणावर काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “आमच्यासाठी काँग्रेसच्या पक्षसंघटनेस सर्वोच्च महत्त्व आहे. राजस्थानमधील समस्येवर पक्ष संघटना मजबूत होईल, असाच तोडगा आम्ही काढू. त्यासाठी आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागला तर आम्ही प्रसंगी तो घेऊ. या प्रकरणी जर (गेहलोत-पायलट गटात) सर्वसंमतीने तडजोड करता आली तर ती केली जाईल. या वादावर काँग्रेस नेतृत्व योग्य तोडगा काढण्यासंदर्भात विचार करत आहे. पण, हे कधी होणार, याबाबत कोणतीही कालमर्यादेची मुदत नाही. ही मुदतही काँग्रेसचे नेतृत्वच ठरवेल.”
‘गेहलोत यांनी काही शब्दप्रयोग टाळायला हवे होते’
“राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी या काही शब्दप्रयोग करणे टाळायला हवे होते. मात्र, अन्य राज्यांप्रमाणेच राजस्थानमध्येही ‘भारत जोडो’ यात्रेची यशस्वी वाटचाल होईल. गेहलोत हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. सचिन पायलट हे तरुण, लोकप्रिय नेते आहे. काही मतभेद आहेत, पण पक्षाला दोघांची गरज आहे. पक्षाचे हित लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल,” असे जयराम रमेश यांनी म्हटलं.