साधारण २२ वर्षांनंतर काँग्रेसमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अध्यक्षपद न स्वीकारण्याची भूमिका घेतल्यामुळे ही निवडणूक घेतली जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरूर यांच्यात थेट लढत होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. असे असताना गेहलोत यांनी पहिल्यांदाच यावर थेट भाष्य करून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर राजस्थानचे नेतृत्व कोण करणार हे काँग्रेसचे नेतृत्व ठरवेल, असेही अशोक गेहलोत म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Congress president election: ‘तो’ काय बाबा मोठ्ठा माणूस, आम्हाला राहुलच हवेत; शशी थरुरांकडे केरळमधल्या नेत्यांचीच पाठ

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे नाकारल्यानंतर साधारण अडीच दशकानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे. या निवडणुकीसाठी आजपासून (२४ सप्टेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ही निवडणूक लढणार असल्याची थेट माहिती पहिल्यांदाच दिली आहे. मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायचे ठरवलेले आहे. राजस्थानमध्ये परतल्यानंतर मी उमेदवारी अर्ज कधी भरायचा यासाठी निश्चित तारीख करणार आहे. पक्षामधील अंतर्गत लोकशाहीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून आपण नवी सुरुवात करुया. देशातील सध्याची परिस्थिती पाहता एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभे राहण्याची नितांत गरज आहे, असे अशोक गेहलोत यांनी सांगितले.

हेही वाचा >>> सचिन पायलट यांची इच्छा पूर्ण होणार का ?

काँग्रेसमधील अन्य नेत्यांनी ही निवडणूक लढवायचे ठरवले असल्यास माझी हरकत नाही. निकाल हाती आल्यानंतर आम्ही काँग्रेस म्हणून सोबत काम करू, असा मला विश्वास आहे. प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उदयास येण्यासाठी आपल्याला आपल्या विचारधावेरच पुढे जायचे आहे. काँग्रेसला ब्लॉक, गाव, जिल्हा स्तरावर मजबूत करण्यासाठी काम करणे गरजेचे आहे, असेही गेहलोत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> बाळासाहेब ठाकरे ४६ वर्षे तर करुणानिधी ५० वर्षापेक्षा अधिक पक्षाचे प्रमुख

यावेळी त्यांनी राजस्थानमधील काँग्रेसच्या नेतृत्वावरही भाष्य केले. मी जर काँग्रेसचा अध्यक्ष झालो तर राजस्थान काँग्रेसची जबाबदारी कोणाला सोपवण्यात येणार, हे आमचे प्रभारी सरचिटणीस अजय माकन आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी ठरवतील, अशी माहिती गेहलोत यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok gehlot official announced he will contest congress presidential election prd