काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत स्वतः मुख्यमंत्री असताना २०१९ मध्ये जोधपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांचे सुपुत्र वैभव गहलोत यांचा पराभव झाला होता. यावेळी वैभव जालोरमधून निवडणूक लढवणार आहेत. यंदा २०१९ ची पुनरावृत्ती होणार नाही, यावर अशोक गहलोत ठाम आहेत. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, अशोक गहलोत यांचे माजी विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी) लोकेश शर्मा यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. निवडणुक काळात झालेल्या या आरोपांमुळे अशोक गहलोत यांचा मुलगा वैभव गहलोत अडचणीत येण्याची शक्यता आहे.
बुधवारी (२४ एप्रिल) लोकेश शर्मा यांनी दावा केला की, इतर गोष्टींबरोबरच, गहलोत यांनी त्यांच्या कार्यकाळात राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष धर्मपाल जारोली यांच्यासह पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. जालोर जिल्हा परिषदेजवळील एक सेवानिवृत्त शिक्षक नरपत सिंह म्हणतात की, वैभव यांची लढाई अजूनही आव्हानात्मक आहे आणि जालोरमध्ये भाजपा मजबूत दिसत आहे. त्याशिवाय गहलोत यांच्याबाबतीत केलेल्या खुलाशांमुळे, काँग्रेसला मिळत असलेले तरुणांचे थोडेफार समर्थनही पक्ष गमावेल.
हेही वाचा : ‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
जालोरमध्ये शिक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी
भाजपाने पेपरफुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (२५ एप्रिल) आग्रा येथे केलेल्या भाषणात लोकेश शर्मा यांच्या दाव्यांचा उल्लेख केला. गहलोत यांनी या प्रकरणावर बोलताना प्रश्न केला की, पंतप्रधानांकडे कोणते पुरावे आहेत. परंतु, जालोरमधील स्थानिकांचे म्हणणे आहे की, गेहलोत सरकारच्या काळात पेपर फुटल्यामुळे, इथे बेरोजगारी ही मोठी समस्या ठरत आहे. गंमत म्हणजे, जालोरमधील राजकीय संभाषणांमध्ये शिक्षण हा एक प्रमुख मुद्दा आहे. विशेषत: भाजपाचे उमेदवार लुम्बाराम चौधरी यांनी २०१६ मध्येच १० वी पूर्ण केली आहे, तर वैभवकडे पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजमधून दोन पदव्या आहेत.
अनुसूचित जातीतील कालबेलिया समुदायातील स्थानिक श्रवण नाथ म्हणाले की, वैभव सुशिक्षित आहेत आणि लुम्बारामऐवजी ते मतदारसंघाचे प्रश्न अधिक स्पष्टपणे मांडू शकतात. माळी समुदायाचे वेलाराम सांखला हे नाथ यांच्याशी सहमत आहेत. ते म्हणतात, “या लोकसभा जागेवर शेवटच्या वेळी १९९९ मध्ये विकास झाला होता, जेव्हा बुटा सिंह (माजी केंद्रीय गृहमंत्री) येथून खासदार होते.” राजपूत समुदायातील निवृत्त शिक्षक हरिराम राठोड म्हणतात की, केंद्रीय मंत्री आणि गुजरातमधील राजकोटचे भाजपा उमेदवार पुरुषोत्तम रुपाला यांनी राजपूतांबद्दल केलेल्या टिपण्णीमुळे तेथे निदर्शने झाली होती. त्याचे परिणाम गुजरातला लागून असलेल्या जालोरमध्येही झाले आहेत.
राजपूत समाजाचा वैभव गेहलोत यांना पाठिंबा
राजपूत समुदायातील भाजपाचे माजी नगरसेवक चंदन सिंह मान्य करतात की, राजपूत समाज वैभव यांना पाठिंबा देत आहे. १५ वर्षांपासून विद्यमान खासदार राहिलेले देवजी पटेल यांना डावलून भाजपाने त्यांच्या पारंपरिक मतदारांसमोर (कालबी ओबीसी, जालोर जागेवरील सर्वात मोठा गट) प्रश्न उपस्थित केले असल्याचे सिंह यांनी सांगितले आहे. कालबी आणि देबासी जालोरमधील प्रमुख ओबीसी गटांवर भाजपा परंपरागतपणे अवलंबून आहे. मात्र, राजपूतांचाही या मतदारसंघावर तितकाच प्रभाव आहे.
राजपूतांसह वैभव गहलोत यांना गैर-कालबी ओबीसी जाती आणि अनुसूचित जाती/ जमातींचा पाठिंबा आहे. काँग्रेसचा एक नेता म्हणतो, “दरझी, नाई, कुम्हार, लोहार, माळी यांसारखे ओबीसी आता भाजपामधून काँग्रेसकडे वळत आहेत. त्यात संतप्त राजपूतांचाही समावेश आहे. कारण भीमळ येथील आमचे आमदार समरजित सिंह हे राजपूत आहेत.”
“१० लाख ओबोसी मते भाजपालाच”
भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रवणसिंह राव यांना विश्वास आहे की, वैभव स्थानिक नसल्यामुळे राजपूत आणि पुरोहितांचा पाठिंबा मिळण्यासह जालोरमध्ये १० लाख ओबीसी मते भाजपाला मिळतील. राव म्हणतात, जेव्हा वैभव आपल्या मुख्यमंत्री वडिलांच्या मदतीने आपल्या घरच्या मैदानात जिंकू शकले नाहीत, तेव्हा ते भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या जालोरमध्ये कसे जिंकणार?” लुम्बाराम यांच्याविषयी राव म्हणतात, “तो एक साधारण माणूस आहे, शेतकरी आहेत. ४० वर्षांपासून ते पक्षाचे कार्यकर्ते असल्याने संपूर्ण संघटना त्यांच्यासाठी कार्यरत आहे. लोकांनाही मोदींना पुन्हा पाहायचे आहे. वैभव यांची उमेदवारी म्हणजे केवळ परिवारवादाचा प्रचार आहे.”
हेही वाचा : सॅम पित्रोदा आणि गांधी घराण्याचं नेमकं काय कनेक्शन?
वैभव यांच्या पत्नी प्रचारात व्यस्त
वैभव यांच्यावर असलेला ‘बाहेरील’ टॅग हटविण्यासाठी त्यांची पत्नी हिमांशी कठोर परिश्रम करत आहेत. त्यांनी मतदारांना आश्वासन दिले की, वैभव यांचा विजय झाला, तर जालोरमध्ये घरे बांधू. परंतु, लुम्बाराम स्थानिक असल्याने, त्यांना कुठे न कुठे फायदा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस उमेदवार वैभव गेहलोत हे भाजपा उमेदवार लुम्बाराम यांच्यापेक्षा २६ वर्षांनी लहान आहे.