१७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर बाहुबली अशोक महातो यांनी रातोरात एका मंदिरात जाऊन दिल्लीतील महिलेशी लग्न केले. १९९० ते २००६ मधील शेखपुरा आणि नवादा येथील दहशतीवर आणि त्यांच्या जीवनावर आधारित ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ नावाची लोकप्रिय वेब सिरीजही प्रदर्शित करण्यात आली आहे. सुटकेच्या एका वर्षानंतर ६२ वर्षीय महातो यांनी बख्तियारपूरमध्ये ४६ वर्षीय कुमारी अनिताशी लग्न केले. विशेष म्हणजे, हे लग्न केवळ लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी करण्यात आले, अशी चर्चा आहे.
मुंगेर लोकसभा मतदारसंघातून आरजेडीचे संभाव्य तिकीट महातो यांच्या पत्नीला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महातो यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने आणि ते १७ वर्षे तुरुंगात असल्याने, २०२९ पर्यंत त्यांना निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर ठेवण्यात आले आहे. यावर तोडगा म्हणून त्यांनी रातोरात लग्न केले आहे. त्यांनी पत्नीसाठी आरजेडीकडे तिकीटाची मागणी केली आहे. जेडी(यू) चे विद्यमान खासदार राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह यांच्या विरुद्ध आरजेडी नवोदित अनिता यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
लालू प्रसाद यांचा आशीर्वाद
महातो आणि पत्नी अनिता मूळचे लखीसरायचे आहेत. विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांनी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद आणि पत्नी राबड़ी देवी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. महातो यांनी या भेटीला सौजन्य बैठक म्हटले. परंतु आरजेडीच्या सूत्रांनी सांगितले की, या बैठकीत अनेक महत्त्वाच्या चर्चा झाल्या. मुस्लीम-यादव अशी स्वतःची प्रतिमा बदलण्यासाठी आरजेडी येत्या लोकसभा निवडणुकीत किमान पाच ते सहा कोरी-कुर्मी ओबीसी उमेदवार उभे करण्याचा विचार करत आहेत. महातो हे कुर्मी समाजाचे आहेत. मागील वर्षी भागलपूर तुरुंगातून त्यांची सुटका झाली. महातो म्हणाले की, तुरुंगात दीर्घकाळात असल्याने, ते कसे बोलावे हे विसरले आहेत. तुरुंगवासासाठी ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जबाबदार धरतात. मात्र त्यांच्याविरोधातदेखील महातो यांनी मौन बाळगने पसंत केले आहे.
जेडी(यू) प्रवक्ते नीरज कुमार यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले, “आरजेडीने उमेदवारांची अधिकृत घोषणा न केल्याने, यावर भाष्य करणे योग्य नाही. परंतु जर महातो यांच्या पत्नीला लोकसभेचे तिकीट दिले गेले, तर ते केवळ आरजेडीची मानसिकता दर्शवेल.” आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले, “आमचे लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. जेडी(यू) ने आम्हाला लक्ष्य करण्याआधी स्वतःच्या काही उमेदवारांचा इतिहास पाहावा.”
१९९० ते २००६ दरम्यान, महातो यांची शेखपुरा, नवाडा आणि लखीसराय येथे दहशत होती. मे २००६ मध्ये मन्नीपूर, शेखपुरा येथे ओबीसी चौरसिया समुदायाच्या सात सदस्यांची हत्या केल्याप्रकरणी शेखपुराचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अमित लोढा यांनी महातो यांना अटक केली होती. महातोच्या आयुष्यावर बिहार डायरीज नावाचे पुस्तक लिहिण्यात आले; ज्यावर ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ वेबसिरीज तयार करण्यात आली. या सर्व खटल्यांमध्ये २००१ मध्ये नवादा तुरुंगातून पळून गेल्याप्रकरणीदेखील त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. काँग्रेस नेत्याच्या हत्येचा आणि अरियारी, शेखपुरा येथील अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
हेही वाचा : अरविंद केजरीवालांनी राजीनामा दिल्यास ‘आप’चे नेतृत्व कोण करणार? लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार?
आरजेडी तिकीट देणार का?
योगायोगाने, आरजेडी महातो यांच्याकडे ओबीसी चेहरा म्हणून पाहात आहेत. परंतु, महातो यांच्यावर ज्यांच्या हत्येचा आरोप आहेत, त्यातील बहुतांश पीडित दलित समुदायातील होते. त्यामुळे अद्याप तिकीट देणार की नाही, यावर निर्णय झालेला नाही. २०११ मध्ये, सिवानचे बाहुबली अजय सिंह यांनीही अशुभ मानल्या जाणार्या पितृपक्षात कविता सिंह यांच्याशी लग्न केले होते. पत्नीला दारौंडा विधानसभा मतदारसंघातून जेडी(यू) तिकीट मिळावे, यासाठी त्यांनी तडकाफडकी लग्न केले. अजय सिंह यांच्या आई जगमातो देवी यांच्या निधनानंतर हा मतदारसंघ रिक्त झाला होता. कविता सिंह यांना मतदारसंघातून तिकीट मिळाले, या तिकीटावर त्या विजयीही झाल्या. सध्या त्या सिवानमधून जेडी(यू) खासदार आहेत आणि पती अजय जेडी(यू)चे नेते आहेत.