कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, रविवारी होणाऱ्या संसदीय पक्षाच्या बैठकीकडे इच्छुकांच्या नजरा खिळलेल्या आहेत. भाजपच्या उमेदवारांची पहिला यादी रविवारी रात्री उशिरा वा सोमवारी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
काँग्रेसच्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर झाल्यामुळे भाजपकडून उमेदवार निश्चितीसाठी इतकी दिरंगाई का होत आहे, असा प्रश्न विचारला जात होता. पण, यावेळी भाजपने मोठ्या घुसळणीतून प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी संभाव्य तीन उमेदवार निवडले आहेत. ही यादी घेऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व संसदीय पक्षाचे सदस्य बी. एस. येडियुरप्पा हे अन्य वरिष्ठ नेत्यांसह शुक्रवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. शनिवारी दिवसभर भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत बैठका होणार असून त्यानंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत संसदीय पक्षाच्या बैठकीत उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली होईल.
हेही वाचा – Odisha Politics : ओबीसींना आकर्षित करण्याचा केला जातोय प्रयत्न, बीजेडी-भाजपात स्पर्धा!
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटकचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, सहप्रभारी मनसुख मांडविया, प्रदेश प्रभारी अरुण सिंह आदी केंद्रीय नेत्यांशी बोम्मई व येडियुरप्पा, केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी आदी कर्नाटक भाजपच्या नेत्यांशी चर्चा करून तीन उमेदवारांच्या पर्यायांतून एकाची निवड करतील. नड्डा तसेच, संघटना समन्वयक बी. एल. संतोष यांचीही स्वतंत्र बैठक झाल्याचे समजते. संतोष हे मूळचे कर्नाटकचे असल्याने त्यांचेही मत पक्षासाठी महत्त्वाचे ठरते.
कर्नाटकातील बोम्मई सरकारची लोकप्रियता घसरू लागल्यामुळे भाजपला उमेदवारांच्या निवडीबाबत सावध राहावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे. काही नेते काँग्रेसमध्ये गेल्याने बंडखोरीची चाहुल आधीपासून लागलेली होती. त्यामुळे भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करणे लांबणीवर टाकले होते. हिमाचल प्रदेशमध्ये झालेली बंडखोरीची पुनरावृत्ती कर्नाटकामध्ये टाळण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उमेदवार निवडीसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला होता. संपूर्ण राज्यातील २० हजारहून अधिक पदाधिकाऱ्यांना आपापल्या मतदारसंघात जिंकण्याची क्षमता असलेल्या तीन उमेदवारांची नावे पाठवण्याची सूचना करण्यात आली होती. या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमांनुसार प्रदेश भाजपच्या पदाधिकारी-नेत्यांनी संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी तयार केली. त्या नावांवर बोम्मई, येडियुरप्पा, नितीन कुमार कतील, अरुण सिंह आदींनी खल करून प्रदेश स्तरावर उमेदवार यादीला अंतिम स्वरूप दिले. या यादीवर नड्डा-शहा यांच्या केंद्रीय स्तरावरील नेत्यांच्या बैठकीत सखोल चर्चा केली जात आहे. त्यावर मोदी रविवारी शिक्कामोर्तब करतील, असे सांगण्यात आले.