मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाचे सूप वाजताच मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी आणि महामंडळांवरील नियुक्त्यांसाठी इच्छुकांचा वरिष्ठ नेत्यांवर दबाव आहे. मात्र त्यात स्थान न मिळणाऱ्या नेते व पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा फटका विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना बसण्याची भीती असल्याने आता दोन-तीन महिन्यांसाठी विस्तार करायचा का, याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये विचारविनिमय सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी भेट घेतल्याने यासंदर्भात विविध तर्कवितर्क सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> महाराष्ट्र जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र; पंतप्रधानांचा विश्वास; २९ हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण;

महायुती सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली असून आता तरी मंत्रिमंडळ विस्तार व महामंडळ नियुक्त्या करून पक्षातील नेत्यांना संधी द्यावी, अशी मागणी तीनही पक्षांमधील नेत्यांकडून वरिष्ठांकडे होत आहे. तीनही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून मंत्रिमंडळ व महामंडळांमध्ये जागा मर्यादित आहेत आणि त्याचे वाटप तीनही पक्षांत कसे करायचे, याबाबत वाद आहेत. त्यामुळे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी विस्तार व महामंडळ नियुक्त्या टाळल्या आहेत. मात्र विधान परिषदेवर राज्यपालनियुक्त बारा सदस्यांच्या नियुक्त्या करण्यासंदर्भात लवकरच निर्णय होईल, असे सूत्रांनी नमूद केले.

अजित पवारांची शहांशी चर्चा

नवी दिल्ली: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार व पुढील दोन-तीन महिन्यांत होणाऱ्या विधानसभेची निवडणूक या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल व सुनील तटकरे हे नेते उपस्थित नव्हते. अजित पवार दिल्लीला एकटेच आल्याचे समजते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aspirants pressuring senior leaders for cabinet expansion in maharashtra print politics news zws