भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या इंडिया आघाडीला एकापाठोपाठ एक धक्के बसताना दिसत आहेत. अनेक राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत स्वतःची वेगळी वाट धरली आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात अशा परिस्थितीतही इंडिया आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे अनेक पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसाम तृणमूल काँग्रेसनेदेखील लोकसभा निवडणुकीसाठी स्वतःचे उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. आसाम तृणमूल काँग्रेसचे प्रमुख रिपुन बोरा यांनी बुधवारी सांगितले की, आसाममध्ये इंडिया आघाडीसोबत जागावाटप होण्याची शक्यता कमी आहे. पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी स्वतःचे चार उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. आसाम तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आसाममधील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील १६ पक्षीय संयुक्त विरोधी मंचाचा अर्थात युनायटेड आपोझिशन फोरमचादेखील एक भाग आहे; जो केंद्र सरकारचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा, २०१९ लागू करण्याच्या विरोधात आहे.

स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय का?

आसाममधील १४ लोकसभा जागांपैकी धुबरी, लखीमपूर, कोकराझार आणि करीमगंज या चार जागांवर तृणमूल काँग्रेस उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक आज होणार आहे. रिपुन बोरा यांनी २०२२ मध्ये काँग्रेस पक्ष सोडून टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. ते म्हणाले की, आघाडीत जागावाटप होईल की नाही याची प्रतीक्षा करू. परंतु, शक्यता खूपच कमी आहे.

“जर पश्चिम बंगालमध्ये जागावाटप होत नसेल तर आसाममध्येही जागावाटप होणार नाही. आमच्या ऐकण्यात आले आहे की, आसाम काँग्रेस त्यांच्या उमेदवारांची यादी ८ मार्चला जाहीर करणार आहे. परंतु, जागावाटपासंदर्भात आमची अंतिम बैठक झालेली नाही. जागावाटपाची शक्यता कमी वाटत असल्याने आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. निवडणुकांना खूप कमी दिवस शिल्लक आहेत, वाट पाहण्यासाठी आणखी वेळ नाही”, असे बोरा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात टीएमसी नेते डेरेक ओ ब्रायन म्हणाले होते की, आगामी निवडणुकीत त्यांचा पक्ष एकट्याने उतरणार आहे. लोकसभेसाठी पश्चिम बंगालमधील सर्व ४२ जागा, आसाममधील काही जागा आणि मेघालयातील एक जागा लढवण्याच्या पक्षाच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असे त्यांनी सांगितले होते.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का; तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा भाजपात प्रवेश

इंडिया आघाडीतील आम आदमी पार्टीनेदेखील आसाममध्ये आपल्या तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. “इंडिया आघाडीतील सदस्यांना जागावाटपाबद्दल सांगून कंटाळा आला आहे”, असे म्हणत आपने फेब्रुवारीच्या सुरुवातीला आपले उमेदवार जाहीर केले होते. परंतु, दुसरीकडे आपने इंडिया आघाडीबरोबर असल्याचेही ठामपणे सांगितले. आसाममध्ये दिब्रूगढ मतदारसंघात इंडिया आघाडीकडून लुरिनज्योती गोगोई यांना उमेदवारी देण्याचे निश्चित असल्याचे सांगण्यात आले आहे. लुरिनज्योती गोगोई हे प्रादेशिक पक्ष असम राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष आणि ऑल आसाम स्टुडंट्स युनियनचे माजी अध्यक्ष आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assam tmc seat sharing chances with indi alliance rac
Show comments