चंद्रपूर जिल्ह्यातील सहांपैकी पाच मतदारसंघांत भाजप-काँग्रेसमध्येच थेट सामना असून राजुरा या एकमेव मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शेतकरी संघटना, अशी लढत आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी मतदारसंघ हा बल्लारपूर आहे. येथे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे संतोषसिंह रावत व अपक्ष डॉ. अभिलाषा गावतुरे, अशी तिरंगी लढत आहे. डॉ. गावतुरे व प्रकाश पाटील मारकवार यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसला मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>Constituencies In Yavatmal : स्थानिक मुद्यांसह जातीय समीकरणे निर्णायक, यवतमाळमधील सातही मतदारसंघात चुरस
ब्रह्मपुरी येथे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरुद्ध भाजपचे कृष्णा सहारे यांच्यात थेट लढत आहे. येथे भाजपने ‘कुणबी कार्ड’ खेळल्याने वडेट्टीवार यांना अधिक परिश्रम घ्यावे लागत आहेत.
अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे आमदार किशोर जोरगेवार, काँग्रेसचे प्रवीण पडवेकर, भाजप बंडखोर ब्रिजभूषण पाझारे व काँग्रेस बंडखोर, असे चार उमेदवार रिंगणात आहेत. येथे जोरगेवार व पडवेकर यांच्यात मुख्य लढत असून दलित, मुस्लीम व ओबीसी समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. दलित समाजाच्या पडवेकरांची काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी कोंडी केली आहे. यामुळे आंबेडकरी समाजाची गठ्ठा मते कुणाकडे वळतात हे बघण्यासारखे आहे.
हेही वाचा >>>Amravati Assembly Constituency : अमरावतीत तिरंगी लढतीत कुणाची बाजी?
कुणबीबहुल वरोरा या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पारंपरिक मतदारसंघात त्यांचे ‘लाडके भाऊ’ काँग्रेसचे प्रवीण काकडे यांचा सामना भाजपचे करण देवतळे यांच्यासोबत आहे. मात्र, येथे वंचितचे अनिल धानोरकर, महाविकास आघाडीचे बंडखोर मुकेश जीवतोडे, डॉ. चेतन खुटेमाटे, असे चार धनोजे कुणबी समाजाचे उमेदवार रिंगणात असल्याने भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. प्रहारचे अहतेशाम अली मुस्लीम समाजाची मते घेतील, असा रागरंग आहे. यामुळे या मतदारसंघात काँग्रेसला फटका बसण्याची चिन्हे आहे.
राजुरा या कुणबीबहुल मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे विरुद्ध शेतकरी संघटनेचे माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्यात लढत आहे. येथे भाजपचे देवराव भोंगळे तिसऱ्या क्रमांकावर जातील, अशी शक्यता आहे. ही माझी शेवटची निवडणूक, अशी साद धोटे व चटप मतदारांना घालत आहेत.
चिमूर मतदारसंघात भाजपचे आमदार बंटी भांगडिया व काँग्रेसचे डॉ. सतिश वारजूरकर यांच्यात लढत आहे. येथे आदिवासी माना समाज निर्णायक भूमिकेत आहे. भाजप उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस उमेदवारासाठी राहुल गांधी या स्टार प्रचारकांच्या सभा झाल्याने या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.