लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
अलिबाग : विधानसभा निवडणूक आठ दिवसांवर आली तरी रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवार कोण याबाबत स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे घटक पक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. उरण, पेण व पनवेल मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शेकाप या दोन्ही पक्षांकडून आपलेच उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत असल्याचा दावा केला जात आहे.
रायगड जिल्ह्यात पनवेल, पेण आणि उरण या तीन विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कोण याची स्पष्टता झालेली नाही. तिन्ही मतदारसंघात शेकाप आणि शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून आपण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला जात आहे. प्रचारात महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर केला जात आहे. त्यामुळे मतदार आणि राजकीय पक्षही चक्रावले आहेत.
आणखी वाचा-अलिबागमध्ये शेकापची प्रतिष्ठा पणाला
उरणमध्ये शेकाप उमेदवाराकडून होणाऱ्या अपप्रचाराबाबत शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवला आहे. उरणमध्ये प्रीतम म्हात्रे यांच्याकडून प्रचारात महाविकास आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांची छायाचित्रे प्रचारात वापरली जात आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे म्हात्रे यांच्यावर करवाई करण्याचे निर्देश द्यावेत, असे पत्र ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.