मालेगाव : सलग चार निवडणुकांमध्ये विजयाचा आलेख उंचावणारे शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची मालेगाव बाह्य मतदारसंघावरील पकड उत्तरोत्तर घट्ट बनल्याचे याआधी अधोरेखित झाले होते. प्रस्थापितांविरोधातील वातावरण आणि दोन तोडीस तोड प्रतिस्पर्धी यांमुळे ही पकड काहीशी सैल होताना दिसत आहे. भुसे यांना विजयाची परंपरा कायम ठेवण्यासाठी मागील निवडणुकीप्रमाणे चमत्कार घडवावा लागेल.
अपक्ष म्हणून दंड थोपटलेले एकेकाळचे खंदे समर्थक बंडूकाका बच्छाव आणि कट्टर राजकीय हाडवैर असलेले शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार अद्वय हिरे यांच्यामुळे होणाऱ्या तिरंगी सामन्यात भुसे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे. विशेषत: बच्छाव यांना मिळणारे वाढते समर्थन भुसे यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रशांत आणि भाजपचे प्रसाद या दोन्ही हिरे बंधूंना अपक्ष निवडणूक लढवीत भुसे यांनी धूळ चारली होती. भुसे यांनी त्यानंतर झालेल्या तीनही निवडणुकांमध्ये विजय मिळवला. पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आलेले भुसे हे नंतर शिवसेनेत परतले होते.
हेही वाचा >>>त्र्यंबकनगरीत पूजाअर्चेसाठी उमेदवारांची गर्दी वाढली
आमदार झाल्यावर भुसे यांनी जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला. सहज उपलब्ध होणारा आमदार आणि जमिनीवरचा नेता अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली. त्याचा फायदा भुसे यांना प्रत्येक निवडणुकीत होत गेला. मागील निवडणुकीत शिवसेनेचे भुसे आणि काँग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे असा सामना रंगला. निवडणूक ऐन रंगात आली असताना शेवाळे यांनी कच खाल्ली. त्यांनी जणू निवडणूक सोडून दिल्यासारखे वातावरण तयार झाले. परिणामी संकटात सापडलेले भुसे ४७ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले.
हेही वाचा >>>नवाब मलिक वि. अबू आझमी: मानखूर्दमध्ये दोन मुस्लीम नेत्यांच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाला लाभ मिळणार?
निर्णायक मुद्दे
● पाच वर्षे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय राहिल्याने मतदारसंघात चांगला निधी आणण्यात भुसे यशस्वी झाले. कृषीसंलग्न सहा महाविद्यालयांचा अंतर्भाव असलेले कृषी विज्ञान संकुल, औद्याोगिक वसाहत, महिला व बालकांसाठी सुसज्ज रुग्णालय, शहर व ग्रामीण भागात निर्माण केलेले रस्त्यांचे जाळे, सिमेंट बंधाऱ्यांमुळे जलसिंचन क्षमतेत झालेली वाढ, बहुप्रतीक्षित नार-पार -गिरणा नदीजोड प्रकल्पास मंजुरी, अशी काही ठळक कामे भुसे यांची जमेची बाजू आहे. भुसे हे प्रामुख्याने विकासाच्या मुद्द्यावरच मते मागताना दिसत आहेत. विरोधकांकडून मात्र झालेल्या विकासकामांच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
लोकसभेतील राजकीय चित्र
महायुती – १,२७,४५४ महाविकास आघाडी – ७२,२४२.