यवतमाळ – राळेगाव हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असताना भाजपने येथे सातत्याने निवडणूक लढवून २०१४ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडून काढून घेतला. भाजपची संघटनात्मक ताकद नसताना २०१४ आणि २०१९ मध्ये मोदी फॅक्टरवर विजयी झालेल्या भाजपसाठी योवळेची लढाई सोपी नाही.
राज्य मंत्रिमंडळात राहिलेले दोन माजी मंत्री या मतदारसंघात एकमेकांविरोधात लढत असल्याने येथील लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भापजचे प्रा. डॉ. अशोक उईक आणि काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके यांच्यात या मतदारसंघात थेट लढत होत आहे. यावेळी निवडणुकीत चमत्कार होईल, असा कोणताही फॅक्टर भाजपकडे नाही. लाडकी बहीण योजनेवर महायुतीची येथे मदार आहे. मात्र शेतकरी, शेतमजूर हा घटक नाराज आहे. २०१४ च्या कार्यकाळात प्रा. डॉ. अशोक उईके यांनी मतदारसंघात १०० कोटी रूपये निधी मंजूर करून सूतगिरणी आणली, मात्र गेल्या सात वर्षात भूमिपूजनाच्या पुढे हे काम गेले नाही.
हेही वाचा >>>आर्वीत उमेदवार पत्नीसाठी पती, तर उमेदवार पतीसाठी पत्नी मैदानात
मतदारसंघात राळेगाव, कळंब, बाभूळगाव या तिन्ही तालुक्यात काँग्रेसकडे वजनदार नेते आहेत. त्या तुलनेत भाजपमध्ये गेल्या १० वर्षात तालुक्यात एकही नेतृत्व उदयास आले नाही, अशी ओरड पक्षातच सुरू आहे. मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद नसतानाही महायुती सरकारच्या योजना आदींच्या भरवशावर भाजप उमदेवारच विजयी होईल, असा विश्वास पक्षातील नेते, पदाधिकारी व्यक्त करत आहे. भाजपचा हा अतिआत्मविश्वासच येथे काँग्रेसच्या पथ्यावर पडेल, अशी चर्चा आहे. २०१९ मध्ये काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके यांचा अवघा ९ हजार ८७५ मतांनी येथे पराभव झाला होता. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राळेगाव मतदारसंघात २४ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे यावेळी महाविकास आघाडीत विजयाचा विश्वास व्यक्त होत आहे. आदिवासी प्रवर्गासाठी हा मतदारसंघ राखीव असला तरी या प्रवर्गातील उपघटक निर्णायक ठरणार आहेत. मतदारसंघात कोलाम समाजाची सर्वाधिक मते आहेत. त्यानंतर गोंड, परधान व ओबीसी, बौध्द, मुस्लीम समाजाची मते आहेत. ही संपूर्ण मते पारंपरिक काँग्रेसची आहे. शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना (उबाठा) या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मतदारसंघात उमदेवारासाठी नव्हे तर पक्षासाठी काम करत असल्याचे चित्र आहे. भाजप मात्र या बाबतीत मागे पडला आहे. महायुतीतील शिवसेना (शिंदे) गट निवडणुकीत अलिप्त असल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राळेगामध्ये कुठलेच अस्तित्व नाही. महायुतीचे उमदेवार प्रा. डॉ. अशोक उईके हे एकटेच निवडणुकीची खिंड लढवत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल मानकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांचा राळेगाव गृह तालुका आहे. या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. पूर्वी प्रा. वसंत पुरके यांची पक्षातच कोंडी केली जायची. यावेळी मात्र असे चित्र नाही. महाविकास आघाडीतील सर्व नेते पक्षांतर्गत हेवेदावे विसरून एकत्र आले. मतदारसंघात वंचित, मनसे आदी पक्षाचे उमदेवार आहेत. मात्र ते प्रभाव ठरणार नसल्योन महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्येच थेट लढत होणार असल्याने राळेगावची निवडणूक रंजक होणार आहे.